Sunday, March 13, 2011

 

मंदीची संकट

जागतिक अर्थव्यवस्थेवरचे मंदीचे संकट रंकापासून रावा पर्यंत प्रत्येकास सचिंत करत आहे. अर्थप्राप्तीचे विविध पर्याय समोर असताना अचानक आलेल्या आर्थिक मंदीने अर्थप्राप्तीचा मार्गच अरुंद झाला आहे. अनेकांच्या डोक्यावर टांगती तलवार रात्रीची झोप उडवत आहे. हा भयावह अनुभव केवळ कर्मचारी कपातीमुळे नोकरदारांनाच येत आहे असे नाही तर लहान व्यापारी वर्गापासून मोठ्या व्यापारीवर्गापर्यंत प्रत्येक जण या मंदीच्या जात्याखाली भरडला जात आहे. आपली नोकरी टिकवणे किंवा नवी मिळवण्याची संधी उपलब्ध होणे हे मोठे जिकरीचे झाले आहे. त्यामुळे सध्याचा मुख्य प्रश्न उपजीवीका हा झाला आहे. त्यामुळे सकाळी कार्यालयात जाताना मनात चिंतेचे ढ्ग निर्माण होतात असा बहुतांश लोकांचा अनुभव आहे, तर व्यापारी वर्गास ग्राहक मिळणे मुश्किल झाले आहे. या परिस्थितीशी सामना करताना गंगाजळी वर भार पडतोच, पण मानसिक थकवाही जाणवतो. यासाठी काय करावे जेणे करुन आपली गुणवत्तेचे,श्रमशक्तीचे योग्य मुल्यांकन होऊन अर्थप्राप्तीचा झरा प्रवाहित होईल हा सगळ्यांना सतावणारा प्रश्न झाला आहे. प्रामाणिक प्रयत्न हे त्याचे प्रधान उत्तर आहे, तरी दैवी उपासना कोणती करावी ? ज्यामुळे मनाचा उत्साह कायम राहील, परिस्थितीशी सामना करण्याचे मनोबल प्राप्त होईल, व्यवहारचातुर्य विकसित होईल व स्पर्धेच्या युगात आपल्या गुणांची योग्य दखल समाजाकडून घेतली जाईल. त्यासाठी अतिशय सोपा उपाय आपल्याकडे सांगितलेला आहे. सकाळी झोपून उठल्यावर कोणाशीही न बोलता गादीवर बसूनच पुढिल मंत्र केवळ १०८ वेळा म्हणायाचा आहे, व दाही दिशांना प्रत्येकी दहा वेळा फुंकर मारायची आहे. मंत्र पुढील प्रमाणे
|| ॐ नमो भगवती पद्म पद्माक्षी ॐ ह्रीं ॐ ॐ पूर्वाय दक्षिणाय उत्तराय पश्चिमाय सर्वंजन वश्य कुरु कुरु स्वाहा ||


हा अनुभव सिद्धमंत्र आहे यामुळे अनेक कुटुंब सुखी झाल्याचा अनुभव आहे. ज्यांचे ग्राहक नक्की नसून रोज नवे ग्राहक शोधावे लागतात अशा फिरत्या व्यापारीवर्गासाठी तर हा मंत्र तारकच ठरतो. जर आपल्या श्रमाची पोच पावती कौतुक, द्रव्य, मानसन्मान अशा कोणत्याही स्वरुपात मिळण्यात अडचणी येत असतील तर या मंत्राचा आपण जरुर जप करा. लाभाचे महाद्वार खुले होईल यात शंका नाही.

विक्रमादित्य पणशीकर,
पेडणे गोवा , ९०४९६००६२२
vnp999@gmail.com

 

सौभाग्याचा महाद्वार खुले करा !

आपल्या भारतीय संस्कृतीत विविधसणाचा बोलबाला आहे. दसरादिवाळी सण मोठा नाही, आनंदाला तोटा असे म्हणण्याचा रिवाजच आहे. दस-यानंतर आपणास वेध लागतात ते दिवाळीचे. दिवाळीचा उत्सव हा दिपोत्सव घराघरात आनंदाने दिव्यांची रोषणाई केली जाते. घराघरात सुखासमाधानाचे, आनंदाचे, आपलेपणाचे, ऐक्याचे, सलोख्याचे, जीवाभावाचे नाते दृढ करण्यासाठी प्रत्येकाला मिळालेली ही सुवर्णसंधी आहे. दिवाळीत वैभवप्रदान करणारी धनप्रदायक लक्ष्मीदेवीची उपासना करण्यात प्रत्येक जण रममाण झाल्याचे दिसते. विविधपद्धतीच्या पूजा, जप, होमहवन, या द्वारे लक्ष्मीची उपसना करण्यात येते. मात्र आपण ज्या वास्तुत राहतो त्या वास्तुत लक्ष्मीची जेष्ठ बहिण अलक्ष्मी वास करत असेल तर कोणत्याही प्रकाराने लक्ष्मीची उपासना केली तरी घरात धनधान्यादी वैभवा आनंद उपभोगता येणार नाही.

घरातील असमाधाचे वातावरण, मतभेदाचा सतत होणारा शंखाध्वनी हे अलक्ष्मीला आग्रहाचे आमंत्रणच ठरते हे विसरून चालणार नाही. अलक्ष्मीने एकदा घरात प्रवेश केला कि तीचे अभद्र साम्राज्य निर्माण करण्याचा वेग अनाकलनीय असाच म्हणावा लागेल. मनातील उत्साहाचे प्रेरणादायी झरे केव्हा गुप्त होतात ते कळतही नाही, आणि प्रगतीचा मार्ग अरूंद होत जातो हा सार्वत्रिक अनुभाव आहे. सब नर करहिं परस्पर प्रिती । चलहि स्वधर्म निरत श्रृती निती॥ ह्या उदात्त विचाराच्या आधारावर घरात आनंदभुवन निर्माण करण्याचा प्रयत्न खंडीत होतो, मग निराशेचा अमरवेल मनास ग्रासण्यास सुरवात करतो. अशी भयावह अवस्था आपल्या मनाची होऊ नये यासाठे दयार्द्रलक्ष्मीची उपासना करण्याकडे मानवाचा कल असणे अत्यावश्यक आहे. मनास उत्साहाचे दिव्यकवच प्राप्त होण्यासाठीच हा दीपोत्सव व लक्ष्मीची उपासना. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रावापासून रंकापर्यंत प्रत्येक जण आपल्या क्षमतेने भक्तवत्सल लक्ष्मीची पूजा करतो. यथाशक्ति पूजा करण्याचा संकल्प हा करंटेपणा करूनही आपणास वैभवप्रद कृपाप्रसादाची अपेक्षा असते आणि वैभव अक्षय अखंडीत व वृद्धिंगत रहावे हा आपला आग्रह असतो. या पेक्षा हास्यास्पद गोष्ट कोणती ? देवी पूजा पद्धती हा उपचाराचा भाग भक्तास समाधानास देणारा असला तरी निरपेक्ष लक्ष्मीला सर्वार्थाने शरण जाणे हे एकमात्र अपेक्षीत आहे. गतिस्त्वं गतिस्त्बं त्वमेका भवानि । ही अचल अभेद्य निष्ठा मनात जागृत करणे परामावश्यक आहे. धनप्राप्तीकारक,वैभवप्रद,वर्चस्वप्रदायक,नेतृप्रदायक अशा नानाविविध मंत्रतंत्रयंत्र याव्दारे पूजा करूनही न मिळणारे मानसिक समाधान भगवतीच्या चरणकमली मनोभावे शरण गेल्याने प्राप्त होते. निःशेष करितां नमस्कार। नासती दोषांचे गिरिवर । आणि मुख्य़ परमेश्वर । कृपा करी॥( ०४-०७-१८) हा समर्थांचा संदेश मनात रूजवल्यास लक्ष्मीकृपेचा वरदहस्त उपासकास प्राप्त होणे सहज साध्य आहे.
सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके।
शरण्ये त्र्यम्बके गौरि नारायणि नमोeस्तुते। ( दु.स.अ.११.१०)

या प्रार्थनेने मनात गतिस्त्वं गतिस्त्बं त्वमेका भवानि । ही भावना जागृत होऊन अलक्ष्मीचे मनावरील अधिराज्य संपूष्टात येऊन मांगल्याची तोरणे घरास सुशोभित करतील असा ठाम विश्वास वाटतो.

विक्रमादित्य दाजी पणशीकर,
पेडणे-गोवा,
९०४९६००९२२
vnp999@gmail.com

 

गुरुकृपा

आपल्या पैकी अनेकांची जन्मानंतर जन्मपत्रिका केली जाते. जन्मनक्षत्राच्या चरणाक्षरानुसार नाव ठेवण्याची पद्धत आहे.जन्मराशीनुसार आपल्या भविष्याचा विचार केला जातो. साधारणपणे प्रत्येक जण पेपर बहितल्यानंतर प्रथम आपले आजचे भविष्य काय आहे हे उत्सुकतेने पहातो हे अनेक जण मान्य करतात.आपल्या पत्रिकेतील नवग्रहापैकी गुरुमहाराज हे भाग्यवर्धन करणारे म्हणून प्रसिद्ध आहेत. गुरुच्या कृपेने आपल्या पुर्वजन्मातील पुण्यफळास येते असा अनुभव आहे. नाडी ग्रंथात अगस्तीऋषी, भृगुऋषी, देवकेरल चंद्रकलानाडी या विश्वप्रसिद्ध ग्रंथात गुरुग्रहाचा विचार करुन विविध ज्योतिष सुत्रांचा आधार घेऊन जातकाचे भविष्य वर्तवले आहे.
आपल्या आयुष्यातील सर्वाधिक शुभ घटनेचा मुलाधार गुरुग्रह असतो असा सर्वांचा अनुभव आहे. त्यामुळे गुरुचे गोचरी भ्रमण आपणास केव्हा अनुकूल होईल याची प्रत्येक जण वाट पहात असतो. शुभ गोचरभ्रमणात प्रगतीस संधी, मंगलकार्ये , विद्याध्ययन, कार्यसाधक भेटीगाठी, व्यावसायिक स्थिरता या प्रकारच्या घटना घडतात. मुख्यता आयुष्यावर शुभ व स्मरणीय परिणाम करण्यात गुरुचा पुढाकार असतो. गुरुग्रह आपल्या पत्रिकेत अष्टकवर्गपद्धतीनुसार जेव्हा सर्वात जास्त शुभबिंदुयुक्त राशीतुन भ्रमण करतो. तेव्हा लक्षणीय घटना घडतात असा अनुभव आहे. आपल्या पत्रिकेवरुन याचा शोध घेणे शक्य होते. आपल्या जन्मपत्रिकेत गुरु ज्याराशीत आहे त्या राशीत अत्यल्प शुभ बिंदु असतील तर भाग्यवर्धक हे गुण वैशिष्ट असणारा गुरु समस्याप्रद ठरतो. यासाठी गुरुकृपेसाठी काही सोपी उपासना करणे गरजेचे आहे. १) दर गुरुवारी हर्बरा डाळ गाईस खाण्यास देणे. २) रोज दत्तबाबनी हे श्रीरंगावधुत महाराजांनी रचलेले स्तोत्र वाचावे. (आपणास हवे असेल तर याची mp3 फाईल मोफत पाठवली जाईल) ३)नवग्रह स्तोत्रातील गुरुचा मंत्र रोज म्हणावा.(आपणास हवे असेल तर याची mp3 फाईल मोफत पाठवली जाईल) ४) माम् पाहि भगवन् दत्त। या मंत्रांचा रोज १००० वेळा जप केल्यास अनाकलनीय लाभ होतो असा अनुभव आहे. आपणासही आयुष्यास मंगलमय, आनंददायक, सर्वथा अभेद्य असे गुरुकृपेचे कवच प्राप्त करायचे असेल, तर केवळ श्रद्धेची गरज असणारे वरील सोपे उपाय करण्याचा सौभाग्यजनक निर्णय घ्या.

विक्रमादित्य दाजी पणशीकर.
पेडणे गोवा -
९०४९६००६२२
vnp999@gmail.com

 

॥ कालभैरवं भजे ॥

१८ नोव्हेंबर २०११ रोजी कालभैरव जयंती आहे. कालभैरव जयंती आहे. कालभैरव हा शंकराच्या अष्टभैरवांपैकी एक देव. कालभैरवास काशीचा कोतवाल ही उपाधी आहे. पुण्यसंवर्धक अशी ही देवता त्वरीत प्रसन्न होणारी आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. आपल्या प्रगतीसाठी झटणा-या मानवाच्या प्रयत्नास यशाची फळे लागतीलच असे कोणी सांगू शकत नाही. मात्र प्रयत्नातील सातत्य हा मानवी स्वभाव सतत जागृत ठेवायचा असेल, तर दैवी उपासना हा सर्वोत्तम आधार ठरतो. दैवी उपासनेने मानसिक बळ प्राप्त होते,सकारात्मक विचारशक्तीचा विकास होतो, सत्कर्माची मनास प्रेरणा मिळते हे आपण नेहमीच अनुभवत असतो. आपण जर प्रयत्नपूर्वक कालभैरवाच्या उपासनेचा मार्ग स्वीकारला तर आपणास सद्वर्तनाची,महत्त्वाकांक्षेची,प्रगतीची परीसीमा गाठाल यात तिळमात्र शंका नाही. आपल्या सहज वर्तनातून परोपकाराचा मकरंद लोकमानसास मोहित करेल याची प्रचिती आल्या शिवाय राहणार नाही. आपले आजचे वर्तन कसे आहे, आपली देवी उपासनेची पार्श्वभुमि किती सुदृढ आहे या सर्व बाबी दुय्यम ठरतात. आपण ज्या क्षणी श्रीकालभैरवाच्या उपासनेचा प्रयत्न सुरु करतो, त्याच क्षणी साधकाच्या यशाचे नंदादीप प्रज्वलीत करण्यास भैरवगण उत्सुक असतात हे अनुभवसिद्ध सत्य आहे. अर्थात यासाठी उपासनेतील सातत्य मात्र महत्त्वाचे आहे. आद्य शंकराचार्यांनी रचलेले कालभैरवाष्टक स्तोत्र नित्य पठणात असणे यशोवर्धक ठरते . या स्तोत्राची फलश्रृती पुढील प्रमाणे आहे.
कालभैरवाष्टकं पठंति ये मनोहरं ज्ञानमुक्तिसाधनं विचित्रपुण्यवर्धनम् ।
शोकमोहदैन्यलोभकोपतापनाशनं प्रयांति कालभैरवांघ्रिसंनिधिं नरा ध्रुवम्॥
कालभैरवाच्या नित्य स्तोत्रपठणाने अज्ञानजन्य पापनिर्मितीची प्रक्रिया बंद होते, त्यायोगे दुर्लभ अशा मुक्तिचे साधन ठरणारे सद्वर्तन आपल्या हातुन सहजगत्या घडते व अविश्वसनीय असा पुण्यसंचय होत जातो. हे यास्तोत्र पठणाचे प्रधान वैशिष्ट्य आहे. शोक, मोह, दैन्य, लोभ, कोप, व ताप या मनोविकृतीचे मनावरील अधिराज्य कालभैरव आपल्या उग्रदृष्टीक्षेपाने भक्तोद्धारार्थ भस्मसात करतो. ध्येयसिद्धिचा स्फुल्लिंग मनात सतत जागृत ठेवण्यासाठी या स्तोत्रपठणाचा अत्युत्तम लाभ होतो हा अनुभव घ्या. ज्यांना यास्तोत्राची mp3 फाईल हवी असेल त्यांना ती विनामूल्य पाठवण्यात येईल.

विक्रमादित्य दाजी पणशीकर,
पेडणे-गोवा,
९०४९६००९२२
vnp999@gmail.com

 

वास्तु म्हणे तथास्तु ।

वास्तुशास्त्र व त्यानुसार गृहरचना या विषयी बराच प्रचार झाला आहे. वास्तुशास्त्राचे नियम घराच्या सर्वांगीण प्रगतीसाठी कसे पोषक आहेत याची माहिती आपणास सहज उपलब्ध होत आहे. ईशान्येस देवघर, पूर्वेस स्नानघर, आग्नेयेस स्वयंपाकघर,दक्षिणेस शयनकक्ष, नैऋत्येस हत्यारे, पश्चिमेस भोजनकक्ष, वायव्येस अन्नधान्य ठेवण्याची जागा, व उत्तरेस तिजोरी ठेवावी असे मार्गदर्शन करणारे श्लोक आपल्या वाचनात येतात. सध्याच्या 1BHK संस्कृतीत वास्तुशास्त्रातील नियमानुसार रचना करण्याचा प्रयत्न प्रत्येकास सहज साध्य होतोच असे नाही. आपल्या वास्तुत आपण वास्तुशांती हा विधी करतो . गृहस्वामी म्हणून आपण आदराने वास्तुदेवतेची स्थापना करतो. वास्तुदेवतेस वास्तोष्पति असेही नाव आहे. अथर्ववेदात रम्य गृहप्राप्तीसाठी सूक्त आहे. वास्तोष्पतिदेवते कडे अन्न, धन, बुद्धी आदींनी समृद्ध असा मी या नूतन गृहामध्ये प्रवेश करीत आहे. माझे समस्त कुटुंबिय येथे प्रेमाने व निर्भयपणे निवास करोत अशा कामनेनी सूक्ताची सुरवात असुन येथे बुभुक्षित अथवा हपापलेले कोणीहि नसोत. ही सर्वात महत्त्वाची प्रार्थना केली आहे. तसेच सूक्ताचा शेवट करताना हे गृहदेवते, तू येथे प्रसन्नपणे राहून सर्वसमृद्धी घडवून आण. तू येथून जाऊ नकोस. अशी प्रार्थना केली आहे. गृहदेवतेचे आशीर्वाद आपल्या प्रगतीस पोषक ठरतात. पण त्यासाठी घरातील वातावरण सतत मंगलमय राहील असा प्रयत्न करावा लागेल. घरात सतत यथाशक्ती धर्मकार्य करणे अगत्याचे ठरते. आपली गृहदेवता कशामुळे प्रसन्न राहील याची काळजी घेणे अगत्याचे आहे. घरात शांतता राखणे, नंदादीप सुरु ठेवणे,धूप घालणे , सर्वात महत्त्वाचे रोज सायंकाळी कालभैरवाष्टक स्तोत्र म्हणणे तसेच शंखनाद करण्याचा प्रयत्न यशोवर्धक ठरेल. घरामध्ये अशुभ विचारांचे तरंगही उठू नयेत यासाठी दक्ष राहणे महत्त्वाचे आहे. वास्तुपुरुष सदैव तथास्तु हा वर देत असतो. तथास्तु म्हणजे तसे होवो. आपल्या शुभसंकल्पास जेव्हा गृहदेवतेचा आशीर्वाद मिळतो,तेव्हा अडथळ्यांची श्रृंखला भेदण्याचे अमोघ सामर्थ्य आपल्यात निर्माण होते. त्यामुळेच वडीलधारी माणसे घरात अशुभ बोलु नये असा आग्रह धरतात. वास्तुदेवता जागृत रहावी म्हणून ॐ चैतन्य वास्तुपुरुषाय नमः। हा मंत्र रोज म्हणणे हितावह ठरेल.

 

ईश सेवा

आपल्या जीवनात सदाचरण व सात्विकता हे दैवीगुण प्रयत्नपूर्वक जोपासले जावेत असे मार्गदर्शन संतामहात्मे करत असतात. आपण जे अर्थार्जन करतो ते नेहमी सन्मार्गाने असावे असा संतांचा आग्रह असतो.
कलियुगाच्या प्रभावाने आपल्या सुखासमाधानाच्या अपेक्षा झपाट्याने बदलत गेल्या, अपेक्षांची पूर्ती करताना योग्यायोग्यतेचे भानही हरपले. "सहज मिला सो दुध बराबर , मांग मिला सो पानी । खींच लिया सो खुन बराबर, कहे कबीर की बानी॥" हे कबीरवचन आपणास सावधानतेचा इशार देत आहे. आपण अर्थाजन कसे करतो, त्याचा विनियोग कोणत्या कामासाठी करतो हे फार महत्त्वाचे आहे. श्रीमद्भागवतात प्रातःस्मरणीय श्रीशुकाचार्य सांगतात --
धर्माय यशसेऽर्थाय कामाय स्वजनाय च ।
पञ्चधा विभजन वित्तमिहामुत्र च मोदते॥‍ ८/१९/३२
अर्थ - जो मनुष्य आपले धनाचे पाच भाग करतो -धर्मासाठी,यशवृद्धीसाठी धनवृद्धीसाठी,उपभोगासाठी आणि स्वजनांसाठी ,तो इहलोकात व परलोकात सुखी होतो.
आपल्या पैशाचा उपभोग घेताना तो कसा घ्यावा हे या श्लोकात सांगितले आहे. धर्माय म्हणजे धर्मकार्यासाठी पैशाचा वापर करावा. आता धर्मकार्य म्हणजे केवळ पूजापाठ असा अर्थ नव्हे तर ज्या ईश्वराच्या शुभाशीर्वादासाठी सगळा खटाटोप त्याला काय प्रिय आहे याचा विचार महत्त्वाचा आहे. देव हा भक्तवत्सल आहे, हे आपण जाणतोच. मग आपल्या स्वकष्टार्जित धनाचा वापर भगवंताच्या दैवीगुणांची उपासना करण्यासाठी करणे योग्य आहे.
रामरक्षेत रामरायाचे गुणवर्णन विद्यानिधी असे केले आहे. आपण केवळ रामरक्षा म्हणून रामसेवेतही स्वरक्षणाचे हित पाहत असतो, आपण जर विद्यानिधी रामाच्या गुणांचा अंगिकार करणा या विद्यार्थांना सहकार्याचा हात पुढे केला त्यांना आवश्यक असणा या सुविधा देण्यात उत्साह दाखवला. तर रामरायाची अमोघ कृपा आपण सहजतेने प्राप्त करु शकतो, आणि आजच्या काळाची ही अत्यावश्यक गरजही आहे. या कार्याने आपल्या धनाचा वापर ईश्वरसेवेसाठी होतोच , पण परोपकाराची सहजप्रेरणा कुलसंवर्धक ठरते. " परोपकारः पुण्याय, पापाय परपीडनम । हा संदेश आपल्या संस्कृतीने जगास दिला तो आपल्या आचरणातून दिसणे अत्यावश्यक नव्हे का ?

 

ॐ शुक्राय नमः ।

प्रत्येक मनुष्यास वैभवसंपन्न जीवनशैलीची आवड असतेच. आपल्या आवडी नुसार शाहीजीवन जगण्याचा प्रयत्न प्रत्येक जण करत असतो. काही वेळा त्याला ते शक्य होते, तर काही वेळा दिखावा करण्याचा मार्ग पत्करला जातो. सध्याचे युग प्रदर्शनाचा पुरस्कार करणारे आहे. विविध सुखसुविधांचा आम्ही उपभोग घेतो हे लोकांच्या लक्षात येईल, याची व्यवस्था करण्यावर भर दिला जातो. त्यावर व्यक्तीचा सामाजिक स्तर ठरवला जाऊ लागला आहे.
आपणास वैभवयुक्त जीवनाचा अनुभव घेता येईल का ? आपले वैवाहिक जीवन सुखमय असेल का ? वाहन सौख्य कसे आहे ? सुखसुविधांनी युक्त घर घेणे होईल का ? प्रतिष्ठीत वर्गाशी स्नेहसंबंध निर्माण होतील का ? याचे उत्तर प्रत्रिकेतील शुक्राच्या शुभाशुभ स्थितीवर अवलंबून असते. असे अनेक वेळा अनुभवास आले आहे कि शुक्राची कृपादृष्टी आनंदमय जीवनाचे प्रधान कारण ठरते.आपल्या पत्रिकेत जर शुक्र कन्या राशीत, पापग्रहांच्या युतीत किंवा दृष्टीत असेल तर स्त्रीशापाने वैवाहिक सौख्य मिळण्यात अडथळे आल्याचे निदर्शनास येते. आपल्या अंगभूत कलागुणांचा विकास करण्याचा अथक प्रयास केला तरी संधीचे दालन खुले होत नाही किंवा रक्ताचे पाणी करून कलोपासना केली तर त्याची कोणतीही दखल कलाक्षेत्रात घेतली जात नाही. संपूर्ण आयुष्य केवळ संघर्षासाठीच आहे का हा प्रश्न मनास त्रस्त करतो. अशा वेळेस शुक्राची सेवा, उपासना करण आवश्यक ठरते. ॥ ॐ शुक्राय नमः ॥ हा मंत्र रोज जास्तीत जास्त वेळा म्हणावा. याची जपसंख्या १६ हजार आहे. आपण शुक्रवार ते शुक्रवार असे अनुष्ठान करून जपसंख्या पूर्ण केल्यास आपल्या आर्थिक स्थितीत बदल होण्यास प्रारंभ होईल. वैवाहिक जीवन सुखमय होईल. आपल्या कलेच्या सादरी करणात चाहत्यांना मोहित करण्याचे असामान्य कौशल्य निर्माण झाल्याचा प्रत्यय येईल. ज्यांचा विवाह ठरण्यात नानाविविध अडथळे येत आहेत त्यांनी हा बिनखर्चाचा पण अनुभवसिद्ध उपाय जरूर करावा. जीवन आनंदमय होईल.

 

कर्तव्यपक्ष

गणेशोस्तवाच्या मंगलमय वातावरणा नंतर पितृपक्षाचा प्रारंभ होतो. भाद्रपद कृष्ण प्रतिपदेपासून भाद्रपद अमावस्येपर्यंतच्या काळाला पितृपक्ष म्हणतात. या काळाचा लोकमानसावर वेगळाच परिणाम जाणवतो. पितृपक्ष हा वाईट आहे . याकाळात शुभ घटना , नवी खरेदी, महत्त्वाची बोलणी करणे टाळाले जाते. मनात या काळा विषयी भिती बाळगली जाते. बाजारपेठामधली उलाढालही या काळात कमी झाल्याचे दिसते. महालयातील काळाचे अकारण भय बाळगले जाते. तसे पाहता महालयास भाद्रपद कृष्ण प्रतिपदेपासून प्रारंभ होत असला तरी समाप्ती रवि तुळ राशीतून वृश्चिकेत गेल्यावर होते. यावर्षी १३ सप्टेंबर २०११ ला महालय सुरु होऊन महालय समाप्ती २७ सप्टेंबर २०११ ला आहे.

आपल्या पितरांच्या तृप्तीसाठी आणि मुख्यतः आपले कर्तव्य समजून जे श्रद्धेने केले जाते ते श्राद्ध.
आयुः प्रजां धनं विद्यां स्वर्गं मोक्षं सुखानि च।
प्रयच्छन्ति तथा राज्यं पितरः श्राद्धतर्पिताः॥ ( ब्रह्मपुराण )

श्रद्धेने श्राद्ध केल्यामुळे पितर तृप्त होतात श्राद्धकर्त्यास पुत्र, धन, विद्या, आयु, लौकिक सुख, मोक्ष तसेच स्वर्ग प्राप्त करता. आपल्या घराण्याची संमृद्ध विचार परंपरा अक्षय स्वरुपात आपल्या पर्यंत आणण्यात ज्यांनी मोलाचे योगदान दिले त्याच्या तृप्ती साठी करायचे कर्म अत्यंत पवित्र असेच म्हणावे लागेल. किंबहूना ते मानवाचे प्रधान कर्तव्य आहे. आपल्या भाग्यवर्धनासाठी व्यवहारातील नातेसंबंध जोपासताना भेटवस्तुंची आदानप्रदान करतो, तसेच आपल्या मृतव्यक्ती विषयी आदरभाव श्राद्धकर्मातून व्यक्त केला जातो. आपल्या परिस्थितीनुसार सपिंडश्राद्ध, ब्रह्मार्पण, हस्तश्राद्ध, आमश्राद्ध व हिरण्यश्राद्ध करण्याची मुभा आहे. आपली पितरांविषयीची प्रेम, आपलेपण व्यक्त करण्यास साधना आवश्यक्यता आहे असे खचितच नाही.

न मे अस्ति वित्तं न धनं न चान्यत् श्राद्ध्योपयोगी स्वपितृन् नतोçस्मि ।
तृप्यन्तु भक्त्या पितरो मयैते भुजौ कृतौ वर्त्मनि मारुतस्य॥

माझ्याजवळ धन नाही, श्राद्धास उपयुक्त वस्तु नाहीत , पण मी मनोभावे आपल्य पितरांना नमस्कार करीत आहे. माझ्या या भक्तीने माझे सर्व पितर तृप्त होवोत. यासाठी मी वा याच्या दिशेनेदोन्ही हात वर केले आहेत. असे म्हणून आपली असमर्थता व्यक्त केली तरी पितरांची कृपा होते. आपणही सर्वशक्तीनीशी पितरांची कर्तव्यभावनेने सेवा करा.

 

विजयी व्हा !

प्रत्येक माणसाची आपले जीवन सुखमय, आनंदाने बहरलेले असावे अशी अपेक्षा असते आणि त्या दृष्टीने यथाशक्ती प्रत्येकाचे प्रयत्नही सुरु असतात. माणसाच्या सुखी जीवनास दुखाःच्या खाईत लोटणारी जी प्रधान कारणे आहेत, त्यात कोर्टकेस व आजारपण यांचा फार वरचा क्रमांक आहे. कोर्टकेसचा मने रक्तबंबाळ करणारा काटेरी विळखा संपूर्ण कुटुंबाच्या हलाखीस, अधोगतीस कारणीभूत ठरतो याचा ह्रदयद्रावक अनुभव कोणास येऊ नये यासाठी काय करावे हा प्रश्न सहजपणे मनात डोकावतो. सावध तो समाधानी। या सुत्रानुसार आपल्या संरक्षणाची व्यवस्था करणे हे प्रत्येकाचे प्रधान कर्तव्य आहे. कारण कलिप्रभावाने विश्वासघात करणारे बलवान झालेले दिसतात. प्रामाणिक प्रयत्न, सत्याचा मार्ग व मोहाचा त्याग करुन जीवन कंठणारे देखील कोर्टकेसमुळे भयावह मनस्ताप भोगताना दिसतात. कायद्याची पायमल्ली करणारे निरंकुश झाल्याने न्यायहक्काची मागणी हाच गुन्हा ठरत आहे असे चित्र आहे. यावर रामबाण उपाय काय याचा विचार करता कोर्टकेस ही दोन गटातील कायद्याच्या मर्यादेतील युद्धजन्य स्थितीच म्हणावी लागेल. शत्रुपक्ष पराभूत होण्यासाठी स्वतःचे मनःसामर्थ्य अतुलनिय असणे अत्यावश्यक आहे. जर केस करणारी व्यक्ती घरातील नसेल व शत्रुपक्ष अतिप्रबळ असेल तर त्यासाठी आपण रामचरित मानस मधील पुढील मंत्र म्हणणे समस्यानिवारक ठरते असा अनुभव आहे.
सुनहु पवनसुत रहनि हमारी । जिमि दसनन्हि महु जीभ बिचारी॥
यामुळे शत्रु भयभीत होतो, प्रसंगी माघार घेतो, किंवा सामंजस्याने तोडगा काढण्यास तयार होतो. आपली सत्याची बाजू असेल तर हा उपाय निश्चितच लाभप्रद सिद्ध होईल.
पण जर कुटुंबातील व्यक्तीनेच काही कारणास्तव कोर्टाची पायरी चढण्यास भाग पाडले असेल, तर आपण पुढील मंत्र म्हणावा.
गरल सुधा रिपु करहिं मिताई। गोपद सिन्धु अनल सितलाई॥
या मुळे गैरसमजाचे समस्याप्रद ढग दूर होतात व नातेसंबंध प्रस्थापित करण्याचा विचार मनात रुजण्यास प्रारंभ होतो. ज्यांना कोर्टकेसच्या चक्रातून आपली सुटका करायची असेल त्यांनी या अनुभव सिद्ध मंत्रांचा जरुर अनुभव घ्यावा.

विक्रमादित्य पणशीकर
पेडणे गोवा
९०४९६००६२२
skype id - vikram.panshikar

 

॥ ॐ विष्णवे नमः ।।

॥ ॐ विष्णवे नमः ।।
आपल्या मन सतत ईश्वरीसेवेकडे आकर्षित व्हावे अशी व्यवस्था आपल्या उत्सवांची आहे. सध्या तुलसी विवाहाचा उत्सव मोठ्या प्रमाणात घरोघरी साजरा केला जात आहे. आज वैकुंठ चतुर्दशी या दिवशी विष्णुपूजेस फार महत्त्व आहे. आपण मनोभावे विष्णुची पूजा या दिवशी करावी. कोणत्याही कार्यास दैवी अधिष्ठान लाभल्या शिवाय, त्या कार्यात सुस्थिर असे सुयश प्राप्त होणे कठिण जाते असा अनेकांचा अनुभव आहे. यश प्राप्त होणे सहज साध्य असले तरी ते सत्याच्या मार्गाने यश प्राप्त होण्यासाठी लागणारी चिकाटी, सन्मार्गावरची अभेद्य निष्ठा , प्रबल आत्मविश्वास प्राप्त होण्यासाठी सत्यस्वरूप विष्णुची भक्ति यशप्रद ठरते. विष्णुची भक्ति कशी प्राप्त होईल याचा खुलासा श्रीभागवतात पुढिल प्रमाणे केला आहे.
श्रीभगवानुवाच
श्रद्धामृतकथायां मे शश्वन्मदनुकीर्तनम्।
परिनिष्ठा च पूजायां सुतिभिः स्तवनं मम॥ (११-१९-२०)
भावार्थ- जे माझी भक्ति प्राप्त करू ईच्छितात , त्यांनी माझ्या अमृतमयी कथांवर श्रद्धा ठेवावी, नेहमी माझ्या गुंणाचे, लीलांचे, नावाचे गुणगान करावे, माझ्या पूजेवर निष्ठा व स्तोत्रांव्दारे माझी स्तुति करा. या उपदेशाचे विनम्रपणे पालन केल्यास आपल्या ह्रदयात वैकुंठाधिपती विष्णुची भक्ति निर्माण होणे सहज शक्य आहे. आपण सर्वशक्तीनीशी विष्णुची पूजा करावी. स्तोत्रपठण, विष्णुसहस्त्रनाम, व्यंकटेश स्तोत्र, यासारख्या स्तोत्रांचे पठण मनातील श्रद्धा सबळ करते. तसेच ज्यांची आर्थिक कोंडी झाली असेल, किंवा आर्थिक स्थैर्यासाठी जे प्रयत्नशील असतील त्यांनी ॥ ॐ विष्णवे नमः ।। हा मंत्राचा रोज जप करावा. भगवान विष्णुच्या नामस्मरणाने सालंकृत घरास लक्ष्मीने स्वहस्ते अमेय यशाचे व अक्षय समाधाचे तोरण बाधणे, हे लक्ष्मी आपले आद्यकर्तव्य समजते. त्यामुळे घरातील वातावरण आनंदमय होऊन आशेचे नवे किरण दिसतील यात तिळमात्र शंका नाही. आपणहि याचा प्रयत्नपुर्वक अनुभव घ्या.

 

सुवर्णप्राशन

सुवर्णप्राशन

सध्याच्या धकाधकीच्या जगांत सुवर्णप्राशन हा शब्दच मुळी लक्ष्यवेधक आहे नां ? बहूचर्चित आणि वैविध्यपूर्ण अशा गुणांनी युक्त सुवर्णाचे प्राशन ( खायचे) म्हणजे नक्की काय ? ह्याचा उपयोग कितपत आहे किंवा ह्याचा उपद्रव काय ? हे प्रश्नच ?? प्रत्यक्षतः कामाच्या धावपळीत माणसाला उसंतच मुळी मिळत नाही. कामाचे व्याप , पैशा मागची धडपड किंवा यश , अर्थ , किर्ती , प्राप्ती इत्यादी मध्ये आरोग्य प्राप्ती किंवा आरोग्य रक्षण होऊन दीर्घायुष्य हा भागच चिंतनीय आहे. कारण व्यवहारात सुद्धा माणसकडे पैसा, सत्ता,मान असुनही आरोग्य किंवा सुखायु प्राप्तीही दुरापास्त वाटणारीच गोष्ट झालेली आहे ! प्रचलित आरोग्य टिकवणारी प्रणालीतही विविधांगी विचार करूनही माणूस मात्र दीर्घायु मिळवु शकला नाही, हे सत्य आहे.आयुर्वेदातील प्राचीन ग्रंथांचा विचार केला तर मात्र अनेक ठिकाणी वारंवार काही औषधी , काही प्रयोग हे इच्छित सिद्धर्थ्य आहेत. ह्यामधील एक भाग म्हणजे धातुंमध्ये श्रेष्ठ (दिसायला, आर्थिकदृष्ट्या महाग आणि औषधीदृष्ट्या गुणकारी) असलेला सुवर्णाचा प्रयोग जर औषधात झाला किंवा औषध म्हणुन झाला तर स्वास्थ्यरक्षणात मात्र उपयोग करून घेता येतो.
सुवर्णप्राशनं ह्येतन्मेधाग्निबलवर्धनम्। आयुष्यं मंगलं पुण्यं वृष्यं वर्णंग्रहापहम्।।
मासात् परममेधावी व्याधिभिर्वच घृष्यते। षडभिमासेः श्रृतधरः सुवर्णप्राशनात भवेत्॥ (महर्षी काश्यप)

सुवर्णप्रयोग अगदी झालेल्या ( एक दिवसाच्या) मुलापासुन कोणत्याही वयात आजाराच्या प्रदीर्घ/ जीर्णावस्थेत/ आत्यायिक अवस्थेत इतकेच नाही तर सगर्भावस्थेसारख्या नाजुक परिस्थितीतही केला जातो.अर्थात निष्णात वैद्यांमार्फत हे सुवर्ण शास्त्रोक्त पद्धतीने शुद्धीकरण करून त्याच्यावरती विविध प्रक्रिया करून नंतरच वापरणे हे श्रेयस्कर आहे. अशाच अनुषंगाने केलेला प्रयोग म्हणजेच सुवर्णप्राशन ह्यामध्ये लहान मुलांमध्ये हे औषध / इतर औषधांसह वापरले जाते, किंवा सोने औषधात उगाळुन चाटण तयार करून दिले जाते.मुख्य म्हणजे ह्या औषधी सुवर्णाचे प्राशन एका ठराविक मात्रेत (मापात) आणि ठराविक काळच दिले पाहिजे.ह्या सेवनाने मेधा ( म्हणजे बुद्धिचा एक भाग), अग्नि (पाचनशक्ती) बल (ताकत) वाढली जाऊन आयुष्यमान वाढवले जाते असा उल्लेख आहे. एका महिन्याच्या प्रयोगाने बुद्धित तर सहा महिन्याच्या प्रयोगाने इतर इंद्रियांची कामे उत्कृष्ट होतात. ह्यामध्येही नुसतेच आयुष्यमान वाढत नसुन व्याधिक्षमता( शरिराच्या रोगाविरुद्ध लढायची प्रतिकार शक्ती) आणि पौरुषत्व वाढवले जाते.आधुनिक शास्त्रांचा विचार करता केला तर सुवर्ण हे Antioxidant म्हणजे शरिरधातुची झीज कमी करून तारुण्य / बल / शक्ती / उत्साह/ प्रतिकारशक्ती आणि वीर्य वाढवणारे आहे हे सिद्ध झालेली गोष्ट आहे. ह्याचा अनुषंगाने शरिराच्या अतिशय प्राथमिक अवस्थेत म्हणजेच जन्मापासूनच्या वाढिच्या वयात ज्या वयात शारिरीक, मानसिक , बौद्धिक ,भावनिक वाढ होते असते त्या अवस्थेत तर सुवर्णाच्या शक्तीने इतर हितकर औषधासह वापर करून चाटण तयार करून जर प्राशन केले तर ते नक्कीच फायद्याचे ठरते.ह्याच विचारप्रणालीने गोव्यातील गोमांतक आयुर्वेद महाविद्यालया तर्फे पाच वर्षापर्यंतच्या मुलांसाठी महिन्यातून एकवेळा असे फक्त १२ वेळा अत्यल्प प्रमाणात आणि मोफत सुवर्णप्राशन करण्याचा प्रयोग सुरू आहे. बालकांच्या स्वास्थ्य संवर्धनासाठी गोमांतक आयुर्वेद महाविद्यालया तर्फे दर महिन्याच्या पुष्य नक्षत्रावर सुवर्णप्राशन शिबिर आयोजित केले जाते. येत्या १६ मार्च रोजी पुष्यनक्षत्रावर महाविद्यालयात तसेच पेडणे येथील शेतकरी सोसायटिच्या सहकार भवनात शिबिर आयोजीत केले आहे. दिवसेंदिवस ह्याचा प्रसार, प्रचार लोकोत्तर होतो असून हजारो बालकांना ह्यांचा फायदा होत आहे. ह्या सर्वांवर विविध कसोट्यांवर पुनः शोध/ संशोधनाची गरज आहे.
परंतु एकंदर चिकित्सा-शास्त्र-व्यवहार आणि तर्कसंगतीचा विचार केला तर खरोखरच सगर्भमातेलाच सुवर्णप्राशन सुरू करायची प्रणाली प्रचलीत होईल ह्यात शंका नाही.

डा. सौ गीता पत्की
एम.डी. (आयुर्वेद),विभागाध्यक्ष,स्त्रीरोग - प्रसुतीविभाग
patkigeeta@yahoo.com
०८२३-२३०६३०९
०८३२-२३०७३९४
विक्रमादित्य पणशीकर
९०४९६००६२२

This page is powered by Blogger. Isn't yours?

Subscribe to Posts [Atom]

Visitors Map
Hosting Branica