Sunday, April 19, 2009

 

रामरक्षा

घराघरात नववर्षाच्या स्वागताची आता तयारी सुरु झाली आहे. नववर्षाच्या स्वागत यात्रेच्या निमित्ताने नवे उत्साहवर्धक उपक्रम सामाजिक बांधिलकी म्हणून आपण करत असतो. आपल्या प्रत्येक शुभकार्यास दैवीकृपेचे अधिष्ठान लाभण्यासाठी आपण साधना करतो. प्रत्येक जण नव वर्षाच्या निमित्ताने आपली उदिष्टे निश्चित करत असतो. जो बड होई सो राम बडाई। जी महत कार्ये पूर्ण होतात ती रामाच्या सामर्थ्याने होतात. भारतीयांचा हा विश्वास घराघरात रुजला असल्याने आपल्या कडे रामरक्षा प्रत्येक घरात म्हणण्याची अखंडित परंपराच आहे, आणि त्याचा अकथनीय असा अनुभव लोकांनी घेतलेला आहे. आपणास आपल्या उदिष्टांचे अत्युच्य शिखर गाठण्याचे मानसिक व शारिरीक बलप्राप्त करावयाचे असल्यास बुधकौशिकविरचित रामरक्षा पठण हा रामबाण उपाय असून त्याची फलश्रुती हा स्वानुभवाने आनंदमग्न होण्याचा विषय आहे. आपल्या कडे कवच पठणास फार महत्त्व दिले आहे. रामरक्षा पठण हे साधकाभोवती रामकृपेचे देवदुर्लभ असे अभेद्यवज्र कवच निर्माण करण्याचा सात्विक मार्ग होय. साधकाच्या शरीराचे श्रीरामाच्या अर्थगर्भित नावांनी संरक्षण करण्याची प्रार्थना रामरक्षेच्या प्रारंभीच्या दहा श्लोकात व्यक्त केली आहे. आपल्या मनात आराध्या देवते विषयी प्रेम, निष्ठा व सतत जागृत राहून ईश्वर साक्षीने प्रत्येक कार्य करण्याची मानसिकता यातून निर्माण होते. आपल्या मस्तकापासून तळव्या पर्यंत प्रत्येक अवयवाचे श्रीरामाने रक्षण करावे ही कामना स्वाभाविक पणे आपल्या प्रगतीचे मार्ग प्रशस्त करण्याचे मनोधैर्य प्राप्त करुन देते.

श्रीराम नवरात्रापासून आपल्या उज्ज्वल भवितव्यासाठी आपण रामरक्षापठणाचे शीघ्रफलदायी अनुष्ठान करण्याचा जरुर प्रयत्न करा. पहाटे लवकर आंघोळ करुन रामरक्षेच्या रोज १०८ आवृत्ती करण्याचा प्रयत्न करावा. श्रीरामनवमी पर्यंत हा उपक्रम रोज सुरु ठेवावा. रामनवमी दिवशी सांगता करावी. आवृत्ती करताना श्लोक क्रमांक १ पासून १० पर्यंत म्हणावेत.( चरितं रघुनाथस्य ते विजयी विनयी भवेत।) हा प्रयोग आपल्या मनात उत्साहीचे नित्य प्रवाही झरे निर्माण करेल. सळसळता उत्साह , नव्या मनःसामर्थ्याची जाणीव, परिस्थितीशी सामना करण्याचे बुद्धिचातुर्य ही यशदायी शिदोरी आपल्या भावी आयुष्यात अटकेपार झेंडा फडकवण्याचे पराक्रमकौशल्य प्राप्त करुन देईल, यात तीळमात्र शंका नाही.यश हे स्त्रोतपठणा मागील अतूट निष्ठेच्या पातळीवर अवलंबून असते, म्हणूनच संत सांगतात राम झरोके बैठ कर, सबका मुजरा लेत। जाकी जैसी चाकरी, ताको वैसा देत॥ त्यामुळे सश्रद्ध मनाने केलीली उपासना निःसंशय फलद्रुप होईल.

विक्रमादित्य

पेडणे गोवा
9049600622
panshikar999@gmail.com




This page is powered by Blogger. Isn't yours?

Subscribe to Posts [Atom]

Visitors Map
Hosting Branica