Thursday, June 4, 2009

 
शनिकृपा
आपण मागील लेखात कृपाळू शनिची कर्तव्यनिष्ठ कार्यप्रणाली वाचलीत. लहान-थोर, गरीब-श्रीमंत प्रत्येकाचे आपल्या समस्यांचा जनक शनि असे ठाम मत झालेले आहे. आजच्या शनैश्चर जयंतीच्या शुभ दिनी हे सार्वत्रिक मत बदलावे या साठी हा लेखन प्रपंच करत आहोत.

मानव आपल्या स्वार्थलोलुप स्वभावधर्मानुसार गैरमार्गाने प्रगतीच्या वाटा पादाक्रांत करत जातो, आणि कर्मफलाचा न्याय निवाडा होताच. शनिला आरोपीच्या पिंज यात उभे केले जाते. आपल्या मनाला ,विचाराला मानवतावादी दृष्टीकोन प्राप्त व्हावा. आपणास नर का नारायण होण्याची सुवर्णसंधी प्राप्त व्हावी यासाठी शनिमहाराज सदैव प्रयत्नशील असतात. त्यांचा उदात्त हेतु आपण लक्षात घेणे नितांत गरजेचे आहे. शनिकृपेची उत्तम लक्षणे म्हणजे मानवाकडे असणारा सकारात्मक दृष्टीकोन, अभेद्य इच्छाशक्ती, अपयशाची कडूगोळी पचवण्याची मनःशक्ती. आपल्यामध्ये असणारे हे गुण विकसीत करणे हे प्रत्येकाचे प्रधान कर्तव्य आहे. असेल माझा हरि तर देईल खाटल्यावरी या पुरुषार्थच्युत विचारसरणीचा शनिने निषेध केला आहे, हे विसरून चालणार नाही.

आपणास शनिकृपेस पात्र होण्याची इच्छा असेल तर काय करणे शक्य होईल याचा विचार करू. शनिमहाराज प्रयत्नशील राहण्याचा सल्ला देत असल्याने कोणत्याही क्षणी दैववादाच्या आहारी न जाता, प्रयत्नात सुसूत्रता आणणे हा शनिस अत्याधिक प्रिय उपाय ठरतो. दैवी उपाय ,शनिसेवा करण्याची इच्छा असेल तर आपण सत्यवचनी असणे अत्यावश्यक आहे. शनिकृपेसाठी औषधी स्नान करण्याचे विधान आहे, यासाठी काळे तीळ, काळे उडीद, लवंग, सुगंधीत पुष्प या वस्तु लोखंडी बादलीत पाण्यात भिजवाव्यात व त्या पाण्याने दर शनिवारी स्नान करावे.स्नान करताना ॐ शनैश्चराय नमः। हा मंत्र म्हणावा. हा उपाय अतिशय सोपा असला तरी त्याचा अनाकलनीय लाभ झाल्याचे अनुभवास आले आहे. आजच्या शनैश्चर जयंतीच्या दिवशी सूर्यास्ताच्या नंतर काळे उडीद, तीळ तेल,काळे उडीद , काळे कापड, लोह पात्र, या वस्तु शनि मंदिरात दान कराणे.

शनिकृपेसाठी आपण नित्य खालील तुलसीदास महाराजकृत रचना रोज १००८ वेळा म्हणण्याची सवय केल्यास उत्तम लाभ होईल.

सुमिरी पवनसुत पावन नामू। अपने बस करि राखे रामू॥

Vikramaditya Panshikar
Pedne - Goa
9049600622
Skype ID - vikram.panshikar

 

ईश सेवा

आपल्या जीवनात सदाचरण व सात्विकता हे दैवीगुण प्रयत्नपूर्वक जोपासले जावेत असे मार्गदर्शन संतामहात्मे करत असतात. आपण जे अर्थार्जन करतो ते नेहमी सन्मार्गाने असावे असा संतांचा आग्रह असतो.
कलियुगाच्या प्रभावाने आपल्या सुखासमाधानाच्या अपेक्षा झपाट्याने बदलत गेल्या, अपेक्षांची पूर्ती करताना योग्यायोग्यतेचे भानही हरपले. "सहज मिला सो दुध बराबर , मांग मिला सो पानी । खींच लिया सो खुन बराबर, कहे कबीर की बानी॥" हे कबीरवचन आपणास सावधानतेचा इशार देत आहे. आपण अर्थाजन कसे करतो, त्याचा विनियोग कोणत्या कामासाठी करतो हे फार महत्त्वाचे आहे. श्रीमद्भागवतात प्रातःस्मरणीय श्रीशुकाचार्य सांगतात --
धर्माय यशसेऽर्थाय कामाय स्वजनाय च ।
पञ्चधा विभजन वित्तमिहामुत्र च मोदते॥‍ ८/१९/३२
अर्थ - जो मनुष्य आपले धनाचे पाच भाग करतो -धर्मासाठी,यशवृद्धीसाठी धनवृद्धीसाठी,उपभोगासाठी आणि स्वजनांसाठी ,तो इहलोकात व परलोकात सुखी होतो.
आपल्या पैशाचा उपभोग घेताना तो कसा घ्यावा हे या श्लोकात सांगितले आहे. धर्माय म्हणजे धर्मकार्यासाठी पैशाचा वापर करावा. आता धर्मकार्य म्हणजे केवळ पूजापाठ असा अर्थ नव्हे तर ज्या ईश्वराच्या शुभाशीर्वादासाठी सगळा खटाटोप त्याला काय प्रिय आहे याचा विचार महत्त्वाचा आहे. देव हा भक्तवत्सल आहे, हे आपण जाणतोच. मग आपल्या स्वकष्टार्जित धनाचा वापर भगवंताच्या दैवीगुणांची उपासना करण्यासाठी करणे योग्य आहे.
रामरक्षेत रामरायाचे गुणवर्णन विद्यानिधी असे केले आहे. आपण केवळ रामरक्षा म्हणून रामसेवेतही स्वरक्षणाचे हित पाहत असतो, आपण जर विद्यानिधी रामाच्या गुणांचा अंगिकार करणा या विद्यार्थांना सहकार्याचा हात पुढे केला त्यांना आवश्यक असणा या सुविधा देण्यात उत्साह दाखवला. तर रामरायाची अमोघ कृपा आपण सहजतेने प्राप्त करु शकतो, आणि आजच्या काळाची ही अत्यावश्यक गरजही आहे. या कार्याने आपल्या धनाचा वापर ईश्वरसेवेसाठी होतोच , पण परोपकाराची सहजप्रेरणा कुलसंवर्धक ठरते. " परोपकारः पुण्याय, पापाय परपीडनम । हा संदेश आपल्या संस्कृतीने जगास दिला तो आपल्या आचरणातून दिसणे अत्यावश्यक नव्हे का ?


Vikramaditya Panshikar
Pedne-Goa,
9049600622
Skype ID - vikram.panshikar











This page is powered by Blogger. Isn't yours?

Subscribe to Posts [Atom]

Visitors Map
Hosting Branica