Thursday, April 16, 2009

 
तुळशीचे कवच
माणसाच्या मूलभूत गरजा अन्न, वस्त्र व निवारा या आपणास माहीत आहेत. आपली निवारा ही गरज पूर्ण करण्यासाठी माणूस दिवसरात्र मेहनत करत असतो. कुटुंबियांच्या कल्पनेप्रमाणे नयनरम्य घराचे स्वप्न आकारास येत असते." घर असावे घरा सारखे, नकोत नुसत्या भिंती " ही रचना आपण नेहमी वाचत असतो.आजच्या आधुनिक युगात घराला घरपण देणारी कोणतीही वस्तु बाजारात उपलब्ध असल्याचे आढळत नाही. घरातील गृहस्वामिनीच्या विचारांवर घराच्या मांगल्याची परंपरा अखंडितपणे चालू राहणार की नाही, हे अवलंबून असते. आपल्या हिन्दुसंस्कृतीत घरावर मांगल्याचे कृपाछ्त्र अविछिन्नपणे रहावे यासाठी घराबाहेर तुळशीवृंदावनाची स्थापना करण्यात येते. तुळस ही सात्विकतेची दैवी प्रतिकृती म्हणून विश्वविख्यात आहे. घराला घरपण देण्यासाठी गृहिणी ही सुहास्यवदना,मधुरभाषिणी, अगत्यशील, व कुलपरंपरा समृद्ध करणारी असणे अत्यावश्यक असते. भूतलावरील या दैवीगुणाचे भांडार म्हणून तुळशीकडे अत्यादराने बघितले जाते. गृहस्वामिनीने तुळशीची नित्य सकाळ संध्याकाळ यथाशक्ती सश्रद्ध मनाने पूजा करावी हा कुलाचार प्रत्येक घरात असतोच. आपण तुळशीकडे केवळ एक झाड म्हणून पाहणे हा एक प्रमादच म्हणावा लागेल. कारण तुळशीच्या दर्शनाचे फळ या दृष्टा निखिलाघसंघशमनी ’असे पद्मपुराणात सांगितले आहे. तिच्या दर्शनाने पापक्षालन तर होतेच ; पण नित्य संर्पकाने मनात सात्विकतेचे बी रुजण्यास मनोभूमी तयार होते. घरास आवश्यक असणारी समाधानीवृत्ती तुळशीच्या उपासनेने प्राप्त होते. तुलसीपूजनाच्या वेळी देवीभागवतातील खालील स्तोत्र म्हणावे.
वृन्दा वृन्दावनी विश्वपूजिता विश्वपावनी ।
पुष्पसारा नन्दिनी च तुलसी कृष्णजीवनी॥१॥
एतन्नमाष्टकं चैव स्तोत्रं नामार्थसंयुतम ।
यः पठेत्तां च सम्पूज्य सोऽश्वमेधफलं लभेत॥२॥
ज्या घरात भौतिक सुखसाधनांची रेलचेल असूनही मांगल्याच्या वातावरणाचा अभाव असतो तेथे तुलसीच्या उपासनेने अक्षय मांगल्य नादण्यास सुरूवात होते. पूर्वी मोठ्या घरात तुलसीवंदावन करणे शक्य होते . काळनुरुप घरे लहान झाली व दुर्दैवाने मनेही लहान होत गेली. आपल्या घरात प्रत्येकाने तुलसीच्या पूजनाची सवय करणे भाग्यवर्धक ठरेल.
आज ग्लोबल वार्मिंग या प्रश्नाने जगास वेठिस धरले आहे.यावर उपाय म्हणून वृक्षलागवड हाच पर्याय समोर आहे. आपली भारतीय संस्कृती वेदकाळापासून " नमो वृक्षेभ्यो " असे म्हणून वृक्षपूजेचा प्रसार करणारी आहे. तुळस ही आक्सिजन देण्यात , वायुमंडल प्रदूषणमुक्त ठेवण्यात अग्रेसर असल्याने तुलसीवंदावनास घराच्या अंगणात स्थान देण्यामागे पूर्वसुरींचा हेतू होता.तुलसीच्या पूजनाचे महत्त्व असते, तसेच आप्तजनांना तुलसीचे रोप देण्याचे महक्तार्य करावे. कारण यामुळे आरो़ग्यसंपन्नता घरात नांदतेच पण घरावर विष्णुकृपा कायम राहते. लंकेतील बिभीषणाच्या घराबाहेरील तुलसीवंदावन पाहून हनुमंत आनंदमग्न झाले, व त्यांच्या मुखातुन उद्गार निघाले " लंका निसिचर निकर निवासा । इहा कहा सज्जन कर बासा॥ अर्थ - लंका हे राक्षसांचे निवासस्थान आहे. येथे कोणत्या सज्जनाचे घर ? आपणही घराभोवती तुळशीची रोपे लावून घरास संरक्षण कवच निर्माण करा, भाग्योदयास निमंत्रण द्या.

विक्रमदित्य दाजी पणशीकर
पेडणे - गोवा
panshikar999@gmail.com
9049600622

Labels:


This page is powered by Blogger. Isn't yours?

Subscribe to Posts [Atom]

Visitors Map
Hosting Branica