Monday, February 20, 2012

 

आर्थिक स्थैर्य


आपल्या जीवनातील कर्तव्ये पार पाडत असताना प्रत्येक पावलावर अर्थसाह्याची गरज भासत असते. अर्थप्राप्तीसाठी प्रत्येक जण सर्वशक्तीनिशी प्रयत्नशील असतो,मात्र पुर्वसंचिता प्रमाणे यशाचा आस्वाद घेणे शक्य होते हेच खरे असा सार्वत्रिक अनुभव आहे. सध्याच्या स्पर्धात्मक युगात आपल्या कार्यशैलीत सुयोग्य बदल करूनहि आर्थिक स्थैर्य मिळवणे हा मार्ग प्रयत्नवादी स्विकारतात.
आपल्या मनोकामनापूर्तीसाठी महालक्ष्मीची उपासना हा सर्वोत्तम पर्याय आहे. प्रयेक कुलाची एक कुलदेवी असते. महाकाली महालक्ष्मी महासरस्वती स्वरूपिणी या श्रद्धेने आपण तीची नित्य नेमाने उपासना करत असतो. तसेच महालक्ष्मीची उपासना विशेषतः आर्थिक उन्नतीसाठी व स्थैर्यासाठी करण्यावर जास्त भर दिला जातो. कोणी शुक्रवारचा उपवास करता, देवीभागवत हा पुण्यप्रद ग्रंथाचे वाचन करतात, श्रीसुक्तपठण व्दारा अभिषेक, देवीकवच पठण, देवीसहस्रनाम पठण व नाममंत्राने कुंकुमार्चन अशा विविध पर्यायांव्दारे देवी उपासना केली जाते. महालक्ष्मीचे इंद्रकृत स्तोत्र म्हणावयास सोपे पण विशेष लाभप्रद असल्याचा अनुभव आहे.
श्रीगणेशाय नमः। इंद्र उवाच।
नमस्तेतु महामाये श्रीपीठे सुरपूजिते।
शंखचक्रगदाहस्ते महालक्ष्मि नमोऽस्तु ते॥१॥
नमस्ते गरुडारूढे कोलासुरभयंकरि।
सर्वपापहरे देवि महालक्ष्मि नमोऽस्तु ते॥२॥
सर्वज्ञे सर्ववरदे सर्वदृष्टभयंकरि।
सर्वदुःखहरे देवि महालक्ष्मि नमोऽस्तु ते॥३॥
सिद्धिबुद्धिप्रदे देवि भुक्तिमुक्तिप्रदायिनि।
मंत्रमूर्ते सदा देवि महालक्ष्मि नमोऽस्तु ते॥४॥
आद्यंतरहिते देवि आद्यशक्ते महेश्वरि।
योगजे योगसंभूते महालक्ष्मि नमोऽस्तु ते॥५॥
स्थूलसूक्ष्ममहारौद्रे महाशक्ते महोदरे।
महापापहरे देवि महालक्ष्मि नमोऽस्तु ते॥६॥
पद्मासनस्थिते देवि परब्रह्मस्वरूपिणि।
परमेशि जगन्मातर्महालक्ष्मि नमोऽस्तु ते॥७॥
श्वेतांबरधरे देवि नानालंकारभूषिते।
जगत्स्थिते जगन्मातर्महालक्ष्मि नमोस्तुते॥८॥
महालक्ष्म्याष्टकस्तोत्रं यः पठेद्भक्तिमान्नरः।
सर्वसिद्धिमवाप्नोति राज्यं प्राप्नोति सर्वदा॥९॥
एककालं पठेन्नित्यं महापापविनाशनम्।
व्दिकालं यः पठेन्नित्यं धनधान्यसमन्वितः॥१०॥
त्रिकालं यः पठेन्नित्यं महाशत्रुविनाशनम्।
महालक्ष्मि पठेन्नित्यं प्रसन्ना वरदा शुभा ॥११॥
॥इति इंद्रकृतः श्रीमहलक्ष्म्यष्टकस्तवः संपूर्णः॥

या स्तोत्राचे नित्यपाठ यशवर्धक , आर्थिक स्थैर्य मिळण्यास उपयुक्त ठरतात असा अनुभव आहे. आपणहि याचा लाभ घ्यावा. ज्यांना यास्तोत्राची mp3 फाईल हवी असेल त्यांना विनामूल्य पाठवण्यात येईल.

विक्रमादित्य दाजी पणशीकर,
९०४९६००६२२
vnp999@gmail.com

 

मारुतीस्तोत्रं




अविचल स्वामीनिष्ठा, अतुलनीय पराक्रम यांचे मुर्तीमंत रूप म्हणजे रामदूत हनुमान. मानवाच्या मनात धर्मनिष्ठा, त्वेष, जिद्द, अन्ययाची चीड, जोम, सत्कर्मासाठी अग्रेसर रहाण्याची प्रवृत्ती निर्माण होण्यासाठी प्रातःस्मरणीय समर्थ रामदासांनी महाबली हनुमंताची उपासना करण्याचा उपदेश लोकांना दिला. हनुमान जयंतीचा उत्सव मोठ्या उत्साहाने जगभरात साजरा केला जातो. भक्तगण आपल्या अपेक्षांची लांबलचक यादी हनुमंताच्या श्रीचरणी सादर करतील. आपल्या मनात राष्टनिष्ठा निर्माण होण्यासाठी किती जण हनुमंताकडे प्रार्थना करतात हा आत्मपरिक्षणाचा विषय आहे. साधारणपणे साडेसाती सुरु झाल्यावर शनिवारी, मंगळवारी हनुमंताच्या मंदिरासमोर लांबचलांब रांग दिसते. आपण आपल्या दैनंदिन जीवनात सुख सुविधांचा अनुभव घेत असतो, त्यामागे भारतीय सैन्याचे, पोलिसांचे जीवनपणाला लागले आहे हे आपण विसरतो असेच म्हणावे लागेल. आपण सहजतेने घेत असलेला श्वास देखील भारतीय सैन्याच्या, पोलिसांच्या अथक परिश्रमाचा परिपाक आहे हे आपणास मान्य करावेच लागेल. हनुमंताची उपासना करताना आपण राष्ट रक्षणासाठी कधी प्रार्थना करतो का ? याचे उत्तर व्यस्त प्रमाणात आहे ही घोर निराशा आहे. भारतीय सैन्यास, पोलीसांना हनुमंताचे अभेद्य कवच प्राप्त करुन देणे आपण आद्य कर्तव्य समजणे नितांत गरजेचे आहे. आपल्या क्षण भराच्या प्रार्थनेने भारताच्या चतुःसिमा रक्षणासाठी सैन्यात पराकोटीचा आवेश निर्माण होईल यात तिळमात्र शंका नाही. मात्र त्यासाठी प्रत्येक भारतीयाच्या मनातील आवेश व त्वेष सतत धगधगता असणे अगत्याचे आहे. आवेश व त्वेष हा प्रतिक्षण मानवास अत्यावश्यक असणार मनोविकार आहे. समर्थ रामदासांनी लिहिलेले भीमरुपी महारुद्रा हे स्तोत्र घराघरात श्रद्धेने म्हटले जाते. समर्थरामदासांनी हिंदुधर्मस्थापनेसाठी सिद्ध हनुमंताचे अत्यंत प्रेरणादायी स्तोत्र केले आहे. या श्रद्धायुक्तमनाने स्तोत्राच्या नित्यपठणाने मनातील निराशा, भय, अगतिकता अशी अवस्था क्षणार्धात दूर होते. त्याच बरोबर आपल्या राष्टाच्या सर्वांगीण रक्षणासाठी हे स्तोत्र अत्यंत प्रभावी आहे. विचार करा रोज प्रत्येकाने या स्तोत्राचे पठण केले तर भारतीय सैन्यास हनुमंत कृपेचे अभेद्य वज्रकवच प्राप्त होईल. स्तोत्र पुढील प्रमाणे-

श्रीगणेशाय नमः।
कोपला रुद्र जे काळी , ते काळा पाहावेचिना।
बोलणे चालणे कैचे, ब्रह्मकल्पांन्त मांडला॥१॥
ब्रह्मांडाहुनी जो मोठा , स्छुळ उंच भयानकु।
पुछ्य ते मुर्डले माथा, पावले सुन्यमंडळा॥२॥
त्याहुनी उंच वज्रांचा, स्छुळ उंच भयानकु।
त्यापुढे दुसरा कैचा, आद्भुत तुळणा नसे॥३॥
मार्तंडमंडळा ऐसे , दोनी पिंगाक्ष ताविले।
कर्करा घडिल्या दाढा, उभे रोमांच उठीले॥४॥
आद्भुत गर्जना केली, मेघचि चेवले भुमी।
फुटले गिरीचे गाभे, तुटले सींधु आटले॥५॥
आद्बुत वेश आवेशे, कोपला रण कर्कशु।
धर्म स्थापनेसाठी , दास तो उठीला बळे॥६॥
॥ श्रीसमर्थ रामदासकृतं मारुतीस्तोत्रं संपूर्णम्॥
अशा अद्भुत वेश धारण करणा-या हनुमंतास आपण भारतात होणारी घुसखोरी, अतिरेकि कारवाया रोखण्याचे आव्हान केले पाहिजे . आपल्या सैन्यदलास मनोबल,अतुलनिय पराक्रम करण्याचे सामर्थ्य देण्याची प्रार्थन करणे अगत्याचे आहे. या स्तोत्रपठणाने आपण हनुमंतास विनंती करत आहोत ती विश्वकल्याण्याची ! हा उदात्त विचार मनात घेऊन आपणही हनुमान जयंतीपासून हे स्तोत्र नित्य म्हणावे ही नम्र विनंती. गायक रघुनंदन पणशीकर यांच्या श्रवणीय आवजातील स्तोत्राची mp3 आपणा विनामूल्य पाठवण्यात येईल. vnp999@gmail.com या मेल id वर मेल करा.
संपर्क - ९०४९६००६२२

 

ग्रह मंत्र

ग्रहमंत्र व राशींची ओळख
सूर्य - रास सिंह
जपाकुसुम संकाशं काश्यपेयं महद्युतिम्।
तमोरिंसर्वपापघ्नं प्रणतोस्मि दिवाकरम्॥
चंद्र - रास कर्क
दधिशंखतुषाराभं क्षीरोदार्णव संभवम्।
नमामि शशिनं सोमं शंभोर्मुकुटभुषणम् ।
मंगळ - रास मेष वृश्चिक
धरणीगर्भ संभूतं विद्युत्कांति समप्रभम् ।
कुमारं शक्तिहस्तं च मंगलं प्रणमाम्यहम् ॥
बुध - रास मिथुन व कन्या
प्रियंगुकलिकाश्यामं रुपेणाप्रतिमं बुधम्।
सौम्यं सौम्यगुणोपेतं तं बुधं प्रणमाम्यहम् ॥
गुरु - रास धनु व मीन
देवानांच ऋषीणांच गुरुं कांचनसन्निभम्।
बुद्धिभूतं त्रिलोकेशं तं नमामि बृहस्पतिम्॥
शुक्र - रास वृषभ व तुळ
हिमकुंद मृणालाभं दैत्यानां परमं गुरुम् ।
सर्वशास्त्र प्रवक्तारं भार्गवं प्रणमाम्यहम् ॥
शनि - रास मकर व कुंभ
नीलांजन समाभासं रविपुत्रं यमाग्रजम्।
छायामार्तंड संभूतं तं नमामि शनैश्चरम्॥
राहू
अर्धकायं महावीर्यं चंद्रादित्य विमर्दनम् ।
सिंहिकागर्भसंभूतं तं राहुं प्रणमाम्यहम् ॥
केतु
पलाशपुष्पसंकाशं तारकाग्रह मस्तकम्।
रौद्रं रौद्रात्मकं घोरं तं केतुं प्रणमाम्यहम्॥

 

इष्ट पतिप्राप्ती सूक्त

इष्ट पतिप्राप्ती सूक्त

१) हे अग्ने, या कन्येला बुद्धिमान आणि भाग्यवान इष्ट पती लाभो. सासरी ही सर्वांना प्रिय होऊन पतीसह सुखाने नांदो.

२)सोम,गंधर्व,अर्यमन् हे हिच्या विवाहास संमती देवोत. धातृदेवाच्या अनुज्ञेने मी हिला वस्त्र अर्पितो.

३) हे अग्ने, सोमराजाच्या कृपेने या भाग्यशालिनीला योग्य पती लाभो. पुत्रसंततीमुळे ही श्रेष्ठ भार्यापदी विराजमान होवो.

४) स्वतःच्या गोठ्यांना ऎश्वर्ययुक्त महाल मानणा-या पशूंप्रमाणे पतिगृह हीला सुखप्रद होऊन तेथे ही सुभगा पतीसह सुखाने ऎश्वर्योपभोग घेवो.

५) (हे कन्ये), सुसज्ज आणि सुस्थित अशा भाग्यरुपी नोकेतून तू आपल्या इच्छित वराप्रत जा. तुझा इष्ट पती तुला प्राप्त होवो.

६) हे कुबेरा, हिचा ईप्सित पती हिला प्राप्त होऊ दे. आप्तेष्टांसहित त्याचे मन तू विवाहानुकूल कर.

७) हे अग्ने, हिच्या इच्छित वरप्राप्तीसाठी सुवर्णालंकार, सुगंधी द्रव्ये आणि उटणे हिच्या पूर्वपतींना प्रदान करण्यासाठी मी तुला अर्पितो.

८) हे कन्ये, सवितृदेव इष्ट पती तुला स्वगृही नेवो. हे औषधे, या कन्येला तू इष्ट पती प्रदान कर.

 

सार्थ बालाशिषः स्तोत्र



माणूस गरीब श्रींमत कोणत्याही अवस्थेत असो, त्याचा सामाजिक दर्जा कोणताही असो, प्रत्येकाची खरी संपत्ती कोणती ? या प्रश्नाचे एकमुखाने मिळणारे उत्तर संतती हेच असते. या संततीच्या ( मुलामुलींच्या) सर्वांगीण विकासासाठी पालक दिवसरात्र स्वप्नरंजन करतात व ते पूर्ण करण्यासाठी अथक परिश्रमाचा मार्ग स्वीकारतात. बालकांच्या आरोग्यास अनारोग्याचे ग्रहण लागले कि पालकांची पळता भुई थोडी होते. सध्याच्या अनाकलनीय प्रदूषणामुळे साथीच्या रोगाचे प्रमाण फार मोठ्या प्रमाणात वाढले आहे. ज्या बालकांची प्रतिकारशक्ती कमी आहे त्याना याचा त्रास हमखास होतो असे प्रत्ययास येते. स्वाईन फ्लु बाबतही लहान मुले हे प्रथम अनारोग्याचे शिकार ठरले. योग्य अशा मार्गदर्शक आचार प्रणालीने , औषधोपचाराने जसे हे रोग दूर ठेवले जातात, तसेच महात्म्यांनी केलेल्या स्तोत्रांव्दारे अनारोग्यास दूर ठेवणे शक्य होते असा प्रत्यय आला आहे. श्री.प.पु. वासूदेवानंदसरस्वतींनी रचलेले सार्थ बालाशिषः स्तोत्र हे अत्यंत प्रभावी , गुणकारी असल्याचा अनुभव अनेकांना आला आहे.

सार्थ बालाशिषः स्तोत्र

स्वांशेनेदं ततं येन स त्वमीशात्रिनंदन।
मुञ्च मुञ्च विपद् भ्योऽमुं रक्ष रक्ष हरे शिशुम् ॥१॥

अर्थ - हे परमेश्र्वरा ! अत्रिपुत्रा, हरे ज्यांनी एका अंशांने हे विश्र्व व्यापले आहे, ते आपण या बाळाची सर्व संकटांपासून मुक्तता करा आणि त्यांचे संरक्षण करा.

प्रातर्मध्यन्दिने सायं निशि चाप्यव सर्वतः।
दुर्द्रृग्गोधूलिभूतार्ति ग्रहमातृग्रहादिकान् ॥२॥
छिन्धि छिन्धिखिलारिष्टं कमण्डल्वरिशूलधृक् ।
त्राहि त्राहि विभो नित्यं त्वद्रक्षालंकृतं शिशुम् ॥३॥

हे दत्तदेवा, या बालकाचे सकाळी, दुपारी, सायंकाळी, रात्री सर्व बाजूंनी संरक्षण करा. हे कमंडलू , चक्र, व त्रिशूल धारण करणा या ( ब्रह्मा-विष्णु-महेश स्वरूपा) या बालकाला त्रास देणा या सर्व वाईट दृष्टींचा, तिन्ही सांजेच्या भूतादि पीडांचा ग्रह , ग्रहमातृका, इत्यादींपासून निर्माण होणा या सर्व पीडांचा आपण नाश करा. आपल्या रक्षणाने अलंकृत झालेल्या या बालकाचे सदासर्वदा संरक्षण करा.

सुप्तं स्थितं, चोपविष्टं गच्छन्तं क्वापि सर्वतः।
भो देवावश्र्विनावेष कुमारो वामनामयः॥४॥
दीर्घायुरस्तु सततं सहओजोबलान्वितः॥

हे दत्तदेवा, या बालकाचे झोपलेले असताना , उभे असताना, बसलेले असताना, अथवा कुठेही जात असताना सर्व बाजूंनी संरक्षण करा. हे अश्र्विनीकुमारदेवांनो, हे बालक निरोगी, सदा सर्वदा तेजेस्वी व बलशाली असो व त्याला दीर्घायुष्य मिळवे. ( ही आपल्या चरणी प्रार्थना आहे)

॥इति श्री.प.प.श्रीवासुदेवानंदसरस्वतीविरचिता श्रीदत्तपुराणान्तर्गत बालाशिषः स्तोत्र संपूर्ण॥

श्री. प.प. श्री वासुदेवानंदसरस्वतींनी रचलेले श्रीदत्तपुराणातील बालाशिषस्तोत्र समाप्त .

बालकाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रत्येक क्षणी दत्तमहाराजांनी संरक्षण करावे व देवादिकांना आरोग्य प्रदान करणारे देवता अश्र्विनीकुमार यांनी बालकास आरोग्यसंपन्न करावे ही केवढी उदात्त संकल्पना आहे . आपल्या पाल्याला श्री चरणी समर्पित करताना त्यास तेजोभास्कर होण्यासाठी बाल्यावस्थेतच प्रवृत्त करण्याचा संकल्प प्रत्येकाने करावा, यामुळे आपली संततीच नव्हे तर कुटुंब व राष्ट यांची वैभवशाली परंपरा पुनःप्रस्थापित होईल यात तिळमात्र शंका नाही. या स्तोत्राची mp3 फाईल वाचकांना ईमेल व्दारे विनमूल्य पाठवण्यात येईल.

विक्रमादित्य दाजी पणशीकर
9049600622
vnp999@gmail.com

 

॥ललितायै नमः॥

प्रत्येक मानवाने आपल्या जीवनात सुखप्राप्तीचा ध्यास घेतलेला असतो. सुखाची व्याख्या व्यक्तीनिहाय वेगवेगळी असली तरी सुखाचा मूलाधार पैसा असे समजले जाते, अर्थात हा केवळ समज आहे हे जरी खरी असले तरी रंका पासून रावा पर्यंत प्रत्येक जण धनसंपन्न होण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करतो असतो हे मात्र खरे. कलीयुगाच्या प्रभावाने न्यायमार्गाने धनधान्यसंपन्न होण्याचा प्रयत्न करणारे आपल्या ध्येयसिद्धिचा आनंद घेताना फारच क्वचित दिसतात. यामुळे मनातील आत्मविश्वासाचा स्तर कमी होतो व मनाचे खच्चिकरण होण्यास प्रारंभ होतो. आपल्या नशिबात अपयशच लिहिले आहे अशा विचाराने त्रस्त झालेल्या व्यक्ती विविध क्षेत्रात दिसतात.


पराभूत मनोवृत्तीच्या दृष्टचक्रातून मार्ग काढण्यासाठी दैवी उपायांचा आधार घेण्याकडे माणसाचा कल दिसतो. आपल्या भारतीय संस्कृतीत देवाच्या उपासनेस अनन्यसाधारण महत्त्व दिले आहे. मनःशक्तीचा विकास करण्यासाठी आपल्या कुलदेवतेची नित्य उपासना हा प्रधान मार्ग सांगितला आहे. कुलदैवत हे मात्यापित्याप्रमाणे आपल्या उपासकाचे पालन पोषण करत असते. आजच्या धकाधकीच्या जीवनात कुलाचाराचे पालन करण्याकडे लोकांचा कल कमी होत चाललेला दिसतो. महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुलदैवतेकडे पाठ फिरवून आपण कोणत्याही अन्य धार्मिक अनुष्ठानाचा मार्ग स्विकारलात, तर तो अपेक्षीत फळ देण्यास कदापि समर्थ ठरत नाही. कुलदेवतेची उपासना असताना जर अन्य काम्यव्रताचा आपण स्वीकार केलात तर त्यात हमखास यश येते असा अनुभव येतो.

यंत्र मंत्र तंत्र या उपासना पद्धतीत अनेकानेक भाग्यवर्धनाचे उपाय सांगितलेले आहेत. त्यासाठी विशिष्ठ अनुष्ठान , पूजा पद्धती सांगितलेली असते. आजच्या धकाधकीच्या जीवनात झटपट फलप्राप्ती व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. सध्या प्रसारमाध्यमाच्या साह्याने यंत्र मंत्र तंत्र यातील विविध उपाय लोकांपर्यंत अगदी
सहजपणे पोहोचतात असते. अर्थात हे सर्व उपायांचा मूळ हेतु विश्वकल्याण हाच आहे. मात्र सध्या आपण इंटरनेट यांच्या साह्याने विविध यंत्रांच्या विक्रिचा सपाटा लावलेला दिसतोय. उदा. श्रीयंत्र, कुबेर यंत्र, सिद्ध हनुमान यंत्र, शनियंत्र अशी नानविविध यंत्रे आज फोन केल्यास उपलब्ध होतात. आणि विशेष म्हणजे ही सर्व यंत्रे सिद्ध केलेली असतात. जे लोक अपयशाच्या चक्रिवादळात सापडलेले आहेत, त्यांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेण्यात विक्रेते अग्रेसर असल्याचे दिसते. धनप्राप्तीसाठी श्रीयंत्राचा जोरदार खप सुरु असल्याचे दिसते. सोने, चांदी, तांब, स्फटिक अशा विविध प्रकारात श्रीयंत्रे उपलब्ध आहेत, व ती सिद्ध करुन देण्याचा दावा केला जातो. हा एक हास्यास्पद प्रकार म्हणावा लागेल. आज कोणत्याही जत्रेत तांब्याची स्फटिकाची श्रीयंत्रे अगदी ५०/- ते ३०००/- रुपयात मिळतात व ती सिद्ध असल्याचा दावा केला जातो. टिव्हीवर सुरु असलेल्या जाहिरातीचा प्रभाव या विक्रिस हातभार लावताना दिसतो. श्रीयंत्र विकत घेतल्यास घरातील देव्हा-यात त्याची स्थापना केल्यास लक्ष्मी प्रसन्न होईल ही श्रद्धा भाविकांना दिलासा देत असते.

श्रीयंत्राची उपासना लक्ष्मी प्राप्तीसाठी करणे हाच मुळात अत्यंत सामान्य हेतु आहे, आणि श्रीयंत्राची मुख्यदेवता लक्ष्मी आहे असेही चुकीचे आहे. श्रीयंत्राची मुख्यदेवता
श्रीललिता आहे. श्रीयंत्राचा अधिकार सर्वश्रृत असा आहे. श्रीयंत्राच्या केवळ दर्शनाने मानवाचे कल्याण होते. मात्र त्यासाठी त्याची रचना शास्त्रसंमत असणे गरजेचे आहे.
उदा. समजा आपण नोकिया कंपनीचा उत्तम मोबाईल घेतला, मात्र त्यात सिमकार्ड घातले नाही तर त्याचा काय उपयोग माझ्याकडे मोबाईल आहे या मानसिक समाधानापेक्षा आपणास काही लाभ होणार नाही. त्याच प्रमाणे शास्त्रसंमत रचनेचे श्रीयंत्र उपलब्ध असेल त्याची विधिवत उपासना होणे नितांत गरजेचे आहे, आणि त्यात सातत्य ठेवणे हि गरजेचे आहे. मात्र सध्या केवळ मी पैसे मोजणार व घरी श्रीयंत्र आणणार हा मार्ग स्विकारलेला दिसतो. त्यामुळे जर आपल्या श्रद्धेस योग्य ते फळ मिळाले नाही तर आपण अजूनच निराशेच्या गर्तेत जातो असे दिसून आले आहे. यंत्र उपासना हा सोपा मार्ग नाही यासाठी कठोरपरिश्रमाची, निरपेक्ष श्रद्धा, अव्यभिचारी निष्ठेची, निर्मलमनोवृत्तीची नितांत गरज आहे. श्रीयंत्र विश्वब्रह्मांडाच्या स्वरुपात आहे. त्यात विविध देवतांचा वास आहे. या यंत्राची देवता श्री ललिता हिचे दास्यत्व देवी महालक्ष्मी व महासरस्वतीने स्विकारले आहे. यावरुन आपण देवीललितेचे महात्म्य ओळखू शकाल. लक्ष्मीप्राप्तीसाठी श्रीयंत्राची पूजा हा मनास न पटणारा विषय आहे. त्याचे कारण विष्णू स्मरण केले तर तेथे लक्ष्मीने उपस्थित होणे हे लक्ष्मी आद्यकर्तव्य समजते, रामनामाचे किर्तन सुरु आहे तेथे हनुमंताने उपस्थित असणे हा हनुमंताचा परमानंदाचा भाग आहे. त्याप्रमाणे श्रीयंत्राची उपासना सुरु असेल तर तेथे धनधान्यादी वैभवाची कधीही वानवा असणार नाही किंबहूना असूच शकत नाही. त्याचे कारण तृप्ती हे श्रीयंत्र उपासनेचे प्रधान लक्षण आहे. श्रीयंत्र उपासनेचा साधक मनाने तृप्त असतो. त्यामुळे त्याच्या घरात सकल वैभव त्याच्या सेवेत धन्यता मानत असते असे चित्र दिसते. भगवान हयग्रीव देवाने अगस्तीऋषींना ललितांबिकेची जी दिव्य नामावली सांगितली त्यात ॐ ह्रींकार-जप-सुप्रीतायै नमः। असे नाव आहे म्हणजे " ह्रीं " या बीजमंत्राचा जप केल्याने जीला परमानंद होतो अशी. आद्यशंकराचार्य कल्याणवृष्टी स्तोत्रात ललितादेवीच्या " ह्रीं " या मंत्राची महती सांगताना पुढील श्लोक रचना केली आहे .....

ह्रीं हींमिती प्रतिदिनं जपता तवाख्यां किं नाम दुर्लभमिह त्रिपुराधिवासे ।
मालाकिरीटमदवारणमाननीया तान्सेवते वसुमती स्वयमेव लक्ष्मीः ॥

केवळ ह्रीं ह्रीं हा रोज जप केल्यासही प्रत्यक्ष लक्ष्मी साधकाच्या सेवेत धन्यता मानते असे आद्य शंकराचार्य म्हणतात.

त्यामुळे नामजपाचे महत्त्व लक्षात घेऊन ॥श्री ललितायै नमः ॥ या मंत्राचा जप करणे हिताचे ठरेल. यासाठी आपल्याकडे कोणत्याही प्रकारचे श्रीयंत्र असणे गरजेचे नाही. जाहीरातबाजीस भुलून विकत घेतलेले श्रीयंत्र किंवा अन्य कोणतेही यंत्र आपल्या भाग्यवर्धनास पोषक ठरेल अशी भोळीश्रद्धा कदापी बाळगू नका. त्यापेक्षा एकही रुपया खर्च न करता दृढ श्रद्धेने
॥ ॐ दौर्भाग्यतूलवातूलायै नमः।। या नावाने गौरविलेल्या ललितेचे नामस्मरण करणे सौभाग्याची नानाविविध दालने खुली करणारे ठरेल, याबाबत आम्हास तिळमात्र शंका वाटत नाही.

श्रीयंत्राची उपासना करावी किंवा करु नये या बाबत हा लेखनप्रपंच नसून केवळ पैशाच्या मोबदल्यात घेतलेले श्रीयंत्र आपल्या सकल मनोकामना पूर्ण करणारे ठरेल असा अर्थ लावणे योग्य नाही. आजच्या काळात संसारी माणसास यंत्र उपासना हा दुर्लभ व दुःसाध्य मार्ग आहे, नामस्मरण हा आपल्या मनास तृप्तीचा आनंद देणारा व व्यावहारीक दृष्ट्या यशाच्या शिखरावर विराजमान करणारा ठरेल असा विश्वास वाटतो. श्री ललिता विजयते !




This page is powered by Blogger. Isn't yours?

Subscribe to Posts [Atom]

Visitors Map
Hosting Branica