Tuesday, July 7, 2009

 
कर्जाचा भार माणूस झाला गार
मानवाच्या मुलभूत गरजा अन्न,वस्त्र,निवारा या आहेत हे आपण जाणतोच. प्रत्येकाच्या आवडीनिवडीनुसार त्यात नाविण्य आणण्याचा प्रयत्न केला जातो. गरजांनाही आकर्षक रुपात आपल्या समोर मांडण्यात येते . त्यात कलात्मक दृष्टीकोन असतो किंवा विक्रेत्यांची मोहक योजनाही असतेच. पण आज या मुलभूत गरजाही सामान्य माणसाच्या अवाक्या बाहेर जाण्याचे चिन्ह रोजचेच झाले आहे. अन्न , वस्त्र, निवारा या पैकी कोणतीही गरज आज पूर्ण करणे मोठे जिकरीचे झाले आहे. श्रम करणारा पोटभर जेवेल असा मानवतावाद केवळ मनास दिलासा देणारा ठरतो कि काय अशी स्थिती सर्वत्र आहे. तर अंगावर देह रक्षणासाठी वस्त्र नाही असे चित्र असताना चित्र विचित्र कपड्यांचे प्रदर्शन मोठ्या चर्चेचा विषय व्हावा अशी विपरीत परीस्थिती सर्वत्र दिसत आहे. तिसरी व सर्वात मुलभूत गरज निवारा ! ही गरज पूर्ण करण्यास मानवास काय दिव्य करावे लागत आहे त्यांचे वर्णन अशक्यच म्हणावे लागेल.आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात आणताना माणसाची खरी सत्वपरीक्षाच होते. आता लहान, मोठे, साधे , टुमदार कसेही घर घेतले तरी कर्जाचा डोंगर डोक्यावर घ्यावा लागतो ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. त्यामुळे स्वप्नातील घरात प्रवेश केल्यावर छान, स्वस्थ, आरोग्यवर्धक झोप लागेल याची खात्री नाही. कर्जाचा हप्ता स्वप्नात आपणास खुणावेल असे भय अंतर्मनात दडलेले असते, कर्ज घेणारा हप्ता भरतोच पण सध्याच्या आर्थिक मंदीने , नोकरीतील अनपेक्षीत कपातीमुळे माणसास कर्जाचे मोठे मानसिक दडपण आले आहे असे निदर्शनास येते. ज्यांनी कर्ज घेतले आहे व जे श्रमशक्तीचा सुयोग्य वापर करून ते फेडण्यात अग्रेसर आहेत ते देखिल आज हवालदिल झाल्याचे चित्र दिसत आहे. यावर दैवी उपाय निश्चीतपणे आहे . आपल्या श्रमाचा योग्य मोबदला मिळावा, हातास काम मिळावे अशी ज्यांची प्रामाणिक भावना आहे त्याना पुढील उपाय निःसशय लाभप्रद ठरेल. मंगळग्रहाचे कर्ज निवारणाचे सामर्थ्य अनन्यसाधारण आहे. त्याचे दान मसूर डाळ व गूळ दर मंगळवारी गाईस दान करावेत. तसेच पुढील मंत्र ॥ॐ ऋणहर्त्रे नमः॥ या मंत्राचा जप रोज १००८ वेळा केल्यास आपल्या श्रमाचा योग्य मोबदला मिळेल. अनेकदा पैसा मिळतो, पण कर्ज फेडले जात नाही तर आजारपणासारख्या कारणाने माणूस हवालदिल होतो. अशा अनेक समस्याजनक कारणांचे समूळ उच्चाटन करण्याचे अमोघ सामर्थ्य आपणास अनुभवायचे असेल लवकरात लवकर कर्जमुक्त व्हायचे असेल तर बिनखर्चाचा असा हा उपाय करून सौख्याचा आस्वाद घ्या.
विक्रमादित्य पणशीकर
पेडणे गोवा
९०४९६००६२२

 
नमः शिवाय
माता च पार्वती देवी पिता देवो महेश्वरः । ही श्रद्धा भारतभुमीच्या कणाकणात रुजली आहे. त्यामुळेचे उद्याच्या महाशिवरात्रीचा महोत्सव मोठ्या उत्साहाने सर्वत्र साजरा केला जाईल. शिवशंकराच्या सेवेचा हा प्रमुख दिवस. भाविक यथाशक्ती आपली सेवा शिवचरणी सादर करण्याचा प्रयत्न करतात. शिवाच्या साध्याभोळ्या स्वभावाचे दाखले आपणास पुराणात पानोपानी मिळतात. श्रीशिवाचा || ॐ नमः शिवाय।| हा मंत्र विशेष प्रिय आहे. आपण शिवाची आराधना करताना कठोर व्रतधारी देवतेची आराधना करतो याचे भान ठेवणे नितांत गरजेचे आहे. वैराग्यमुर्ति शिवाची उपासना सश्रद्ध मनाने शिवास सर्वस्व समजून करणे अगत्याचे आहे.शिव म्हणजे मांगल्य,आनंद,सळसळत्या उत्साहाचे अक्षय भांडार. शिवाची उपासना खडतर असल्याने पर्यायाने साधकाचे मानसिक व शारिरीक सामर्थ्य वृद्धिंगत करणारी ठरते. अमरनाथ या दुर्गमस्थळाची तिर्थयात्रा केवळ शिवकृपेनेच शक्य झाल्याचे यात्रेकरु कृतार्थ मनाने सांगतात.
महाशिवरात्रीच्या शुभदिनी शिवपूजे साठी खाली दिलेले शिवयंत्र आपण स्वतः घरी करु शकाल.यासाठी बारा आडव्या व नऊ उभ्या ओळी आखाव्यात . आपणास १०८ चोकोन तयार झाल्याचे दिसेल , या प्रत्येक चोकोनात केशरयुक्त चंदनाने ॐ नमः शिवाय हा मंत्र लिहावा.आपण हे यंत्र भुर्जपत्रावर काढावे, भुर्जपत्र न मिळाल्यास साध्या कागदावर लाल शाईने काढावे.
या यंत्राची पूजा महाशिवरात्री दिवशी रात्री निशीथकाली करावी. उद्या निशीथकाल २४.२८ ते २५.१७ या वेळेत आहे. यथासांग पूजा ,जप करुन मंत्रोच्चाराने १०८ बिल्वपत्रे अर्पण करुन शिवस्तुती हे स्तोत्र वाचावे(कैलास राणा शिव चंद्रमौळी).श्रीवसिष्ठ विरचित दारिद्र्यदहनशिवस्तोत्राचे ११ पाठ करणे विशेष फलदायी ठरेल. हे स्तोत्र म्हणावयास सोपे व शिघ्रफलदायी आहे. याप्रकारे पूजा केलेले यंत्र आपण नित्यपूजेत ठेवा. घर,व्यवसाय केंद्र या ठिकाणी यंत्राची स्थापना करणे भाग्यवर्धक ठरेल. आपल्या प्रगतीस यामुळे चालना मिळेल. अडथळ्यांची श्रृंखला खंडित होऊन , प्रामाणिक प्रयत्नास सुयश प्राप्त झाल्याचा अनुभव येईल. आपल्या नियोजीत उदिष्टपूर्तीसाठी लागणारी सकारात्मक उर्जा आपणास प्राप्त होईल. स्वतःचे वेगळेपण सिद्ध करण्याच्या या स्पर्धात्मक युगात सतत कार्यतत्पर राहण्याचे मनःसामर्थ्य शिवसाधनेने प्राप्त होईल.यामुळे मनात ठाण मांडून बसलेली भयप्रद निराशा, मरगळ, अपयशाच्या वेदनादायी आठवणींचे पाश आपण लिलया तोडू शकाल यात शंका नाही. विजय मग तो कोणत्याही क्षेत्रात असो त्यासाठी लागणारी असामान्य चिकाटी, अभेद्य महत्त्वाकांक्षा व दुर्दम्य सहनशीलता शिवकृपेने प्राप्त होते. त्याचा लाभ व्यक्तीगत जीवनात महाशिवरात्रीच्या निमित्ताने घेताना भारतभुमीत जळीस्थळी मृत्युचे तांडव सुरु असताना, राष्ट्र्संरक्षणार्थ व संवर्धनार्थ बान्धवाः शिवभक्ताश्च स्वदेशो भुवनत्रयम। हा विचार मनामनात रुजवण्याचे व्रत प्रत्येकाने कर्तव्यभावनेने स्वीकारणे नितांत गरजेचे आहे. मृत्युंजय सदाशिवाचे अभेद्यवज्र कवच भारतभुमीस प्राप्त होवो ही प्रार्थना.

 

पद्ममुद्रा


पद्ममुद्रा
आजच्या आधुनिक युगात प्रत्येक जण सुखाच्या शोधार्थ अपार मेहनत करताना दिसतो.कोणत्या आशाआकांशा पूर्ण करण्यासाठी आवश्यक असते पैशाचे पाठबळ,म्हणूनच रंका पासून रावा पर्यंत जण लक्ष्मीची उपासना करण्यात मग्न झालेले दिसतात.
या लक्ष्मीचे आसन कोणते याचा आपण विचार केला तर असे दिसते की ती कमलासना आहे. कमळ हेच तिचे आसन आहे. कमळ हे आसन निवडताना देवीलक्ष्मीने कमळाचे दैवी स्वभाव गुण लक्षात घेतले असावेत. चिखलात उमलणारे कमल स्वतः मात्र शुद्धस्वरुपात राहून मानवास संसारात कसे आचरण असावे याचा संदेश देत असते. आपण धनलक्ष्मीचे ध्यान करताना आपणास दिव्य आभुषणांनी सालंकृत लक्ष्मी , तसेच देवीच्या हातातील मोहरा याचे दर्शन होते. परंतु सर्वसाधारण पणे आपण कमलासनास महत्त्व देत नाही. आपण देवी उपासना करुन दुर्भाग्याचे पाश दूर करण्याचा प्रयत्न करीत असतो. जी स्वभावतः भक्तवत्सल, विश्वकल्याणास तत्पर अशी देवी आपल्यावर केव्हा कृपा कटाक्ष करणार हा प्रश्न नेहमी सचिंत करत असतो.

आपणास जर लक्ष्मीची कृपा प्राप्त करायची असेल, देवीने ह्र्दयमंदिरात आसनस्थ व्हावे ही इच्छा असेल तर आपणास आपले मन कमळाप्रमाणे शुद्ध ठेवावे लागेल.देवीचे उपासक निःसंशय अर्थसंपन्न होतीलच किंबहुना ते निराधारांचे आधारही ठरतील हा देवीने वर दिला आहे. देवी उपासना करताना विविध स्तोत्र, मंत्र जप करण्याची पद्धत आहे. आपण जे स्तोत्र पठण करतो त्या वेळेस हाताने पद्ममुद्रा केल्यास आपणास मिळणार स्तोत्र पठणाचे फळ कित्येक पटिने वाढेल.
आपण फक्त स्तोत्र म्हणताना पद्ममुद्रा करुन , स्तुतीने अलंकृत असे पद्म म्हणजेच कमळ देवीला सर्मपित करत आहोत हा भाव मनात ठेवणे नितांत गरजेचे आहे. कारण प्राणप्रिय भगवान विष्णुस कमलपुष्प अतिव प्रिय असल्याचा उल्लेख विष्णुरहस्यात पुढिल प्रमाणे आहे -

कमलेनैकेन देवेशं यो‍ऽर्चयेत कमलाप्रियम।
वर्षायुतसहस्त्रस्य पापस्य कुरुते क्षयम ॥

अर्थ- कमलपुष्पाने कमलाप्रिय विष्णुची पूजा केल्यास करोडो वर्षातील पापांचा भगवान नाश करतो.

पतिव्रता लक्ष्मीस यामुळे पद्ममुद्रेच्या रुपाने पतिप्रिय वस्तु प्रदान करण्याचा आपण प्रयत्न करणे यशदायक ठरते.
आपल्या प्रामाणिक प्रयत्नास जेव्हा सुयशाचे कोंदण मिळणे दुरापास्त होते तेव्हा आपण देवीने दिलेल्या आशीर्वाद मंत्राचे पठण करताना पद्ममुद्रा करणे यशोवर्धक ठरेल याची खात्री बाळगा.

सर्वाबाधाविनिर्मुक्तो धनधान्यसुतान्वितः।

मनुष्यो मत्प्रसादेन भविष्यति न संशयः॥(१२-१३)

भावार्थ- मनुष्य माझ्या कृपाप्रसादाने सगळ्या बाधांपासून मुक्त होईल, धन ,धान्य तसेच पुत्र यांनी संपन्न होईल यात संशय नाही.


 
बटुकभैरव
कलीयुगाचा झपाट्याने मानावाच्या आचरणावर होणारा परिणाम हा भयप्रद असाच म्हणावा लागेल. सत्ययुगातील प्रामाणिकपणाचे सहज होणारे दर्शन आता देवदुर्लभ झाले आहे,म्हणूनच रिक्षा ट्क्सीत सापडलेली पैशाची थैली परत करणारा आज सन्मानास प्रात्र ठरत आहे.
आजचे प्रधान व्यवहार सुत्र पैसा भगवान नही पर भगवान से कम नही असे झाले आहे. त्यामुळे अर्थप्राप्तीचा मार्ग कोणता हे दुय्यम ठरते, तर भरघोस व जलद अर्थप्राप्तीस महत्त्व दिले जाते.या सर्व प्रक्रियेत व्यवहारनिती पायदळी तुडवली जाते, व त्याचा मोठा फटका प्रामाणिक प्रयत्न करणा यास बसतो. आज तुझे ते माझेच ही विचारधारा फोफावली आहे. कुटुंबसंस्थे पासून समाजातील प्रत्येक स्तरावर अन्यायाचे साम्राज्य बोकाळले आहे. या मध्ये सरळमार्गी माणसांचे जीवन फार कष्टप्रद होते. त्यांना गैरव्यवहार रूचत नाही प्रगती करणे अशक्य होते. आपले स्वामित्त्व सिद्ध करण्याच्या अतिरेकी वृत्तीने समाजातील जीवनमानच अस्थिर झाले आहे. लांगुलचालन करणारेच तरतील असे चित्र आहे. समाजात जाणीवपूर्वक त्रास देणाचे प्रमाण फार वाढल्याचा सर्वसाधारणपणे प्रत्येकाचा आपल्या कार्यक्षेत्रातील अनुभव आहे. कोणी प्रगतीत झारीतील शुक्राचार्य होतात, आपल्या विरोधात गैरसमजाचे वावटळ उठवले जाते, आरोपप्रत्यारोपांचे षडयंत्र, कोर्टकेसचे मानसिक भय, आर्थिक व्यवहारातील विश्वासघात अशा विविध समस्यांचा अनुभव समाजातील प्रत्येक वर्गातील लोक घेत असतात. या समस्यांवर खातरीशीर रामबाण उपाय करणे फार गरजेचे असते, अन्यथा निराशा मनात घर करते व मन हवालदिल होऊन प्राप्त परिस्थिती समोर शरणागती पत्करते. असे होणे हे सामाजिक नितीमुल्यास मुठमाती घालण्यासारखे ठरले. ज्यांना त्राही भगवान त्राही भगवान असे म्हणण्याची वेळ समाजातील गैरवर्तनाचार्य आणतात त्यांना योग्य वेळीच धडा शिकवणे किंवा आपली आगामी संकटांची श्रृखला तोडणे अत्यावश्यक ठरते. यासाठी नित्य उपासना करणे नितांत गरजेचे आहे. आपण कोणत्या देवतेची उपासना करावी हा प्रश्न समोर उपस्थित होतो. शंकराचा अवतार भगवान बटुकभैरव या देवतेची साधना निसंशय उपकारक ठरते. या देवतेचा मंत्र पुढील प्रमाणे आहे.
॥ॐ ह्रीं बटुकाय आपदुद्धरणाय कुरू कुरू बटुकाय ह्रीं॥
या मंत्राचा जप रोज १००० वेळा केल्यास प्रगतीचा मार्ग मोकळा होतो असा अनुभव आहे. या बरोबर कालभैरवाष्टक स्तोत्र रोज म्हटल्यास अपेक्षीत काम मार्गी लागेल. ज्यांना कालभैरव स्तोत्र mp3 फाईल मोफत पाठवली जाईल.ती रोज घरी सुरु ठेवल्यास लाभाची शक्यता बळावेल असा विश्वास वाटतो.
विक्रमादित्य पणशीकर
पेडणे - गोवा
९०४९६००६२२

 
॥ लक्ष्मीनृसिंह प्रसन्न ॥
आजच्या धकाधकीच्या जीवनाचा सामना करुन आपण आपल्या कुटुंबास उर्जीतावस्था यावी यासाठी प्रयत्न करत असतो. आपल्या समोर प्रगतीचे विविध मार्ग असतात. त्यातुन कोणता निवडावा आणि त्यात आपणास सुयश प्राप्त होईल का ? असे अनेक प्रश्न आपणास सतावत असतात. आपल्या अंगभूत गुणांचा विकास होण्यास योग्य संधी मिळणे , विद्येच्या साह्याने अर्थार्जन होणे , समाजात सन्मानाची वागणूक मिळणे या सर्व घटना भ्रष्टाचाराने सालंकृत समाजात देवदुर्लभ म्हणाव्या लागतील, आणि त्यामुळेच समाजातील प्रामाणिक नागरिक, विविध क्षेत्रातील निष्ठावंत संशोधक, कलोपासक, सिद्ध सारस्वत हे दुर्लक्षीत राहतात. यशाचा आनंददायक आस्वाद घेणे हा गुणवत्तेचा विचार करता हक्क असणारी प्रामाणिक प्रयत्नवादी व्यक्ती मनास निराशेचे ग्रहण लागेल ह्या भितीने ग्रस्त असते ही विदारक स्थिती सर्वत्र दिसते. आणि यानंतर सुरु होतो आपल्या प्रयत्नास दैवीकृपेचा वरदहस्त लाभावा यासाठी सुरु होते दैवीउपायांची शृंखला. आपल्या पत्रिकेतील कुयोगाचा विचार मन अस्वस्थ करतो. त्याच्या निवारणासाठी विविध खर्चीक उपायांचा सल्ला दुष्काळात तेरावा महिना आणणारा ठरतो असा अनेकांचा अनुभव आहे.. अपयशाच्या सावत्रक्षणी आपणास साथ देणारे ,धीराचा सल्ला देणारे, आत्मविश्वास वृद्धिगत करणारी व्यक्ती भेटणे हे पुर्वपुण्य फलद्रुप होण्यासारखेच म्हणावे लागेल.
आपण मदतीचा हात कोण देईल याची चातका प्रमाणे वाट पहात असतो, केवळ एक संधी आपले भाग्य बदलेल हि मनाची खात्री असते. पण प्रत्येक संधी मृगजळ ठरते आणि आशेचे रुपांतर निराशेत होत असताना सावध होण्याची कृपाळू पणे अल्प धारिष्ट पाहे। हा सल्ला प्रगतीसाठी कार्यप्रणव करणारा ठरतो. आपण मदतीचा हात इतरांकडे मागतो तेव्हा आपल्या करकमलांच्या अग्रभागी निवास करणा या जगजननी लक्ष्मीचा अवमान करतो असतो हे विसरुन चालणार नाही. आपल्याला अपयशाच्या नरकयातनां मधून सोडवण्यासाठी आपण कमलापती अशा लक्ष्मीनृसिंहास शरण जावे असा आद्य शंकराचार्यांनी उपदेश केला आहे, म्हणूनच संकटनाशनं लक्ष्मीनृसिंह स्तोत्रात लक्ष्मीनृसिंह मम देहि करावलंबम् । ही प्रार्थना केली आहे. संकटनाशनं लक्ष्मीनृसिंह स्तोत्राची महती सर्वत्र गायली जाते. या स्तोत्राच्या पठणाने आर्थिक दृष्ट्या गांजलेले कालांतराने निःसंशयपणे अर्थसंपन्न झाल्याचे अनुभवास आले आहे. हे स्तोत्र संस्कृत मध्ये आहे त्यामुळे प्रथम शिकावे लागेल. ज्यांना श्रवण करणे शक्य आहे. त्यांनी संपर्क साधल्यास स्तोत्राची MP3 फाईल पाठवली जाईल. पण ज्यांना म्हणणे सरावाच्या अभावी शक्य नाही, त्यांनी केवळ लक्ष्मीनृसिंह मम देहि करावलंबम् । असा आर्ततेने लक्ष्मीनृसिंहाचा धावा करुनही कल्पनातीत लाभ झाल्याचे निदर्शना़स आले आहे. आपणही याचा अनुभव घेऊन जीवनास नित्य नूतन आनंदाच्या तोरणाने सुशोभीत करावे.
panshikar999@gmail.com


 

ॐ शुक्राय नमः ।

ॐ शुक्राय नमः ।


प्रत्येक मनुष्यास वैभवसंपन्न जीवनशैलीची आवड असतेच. आपल्या आवडी नुसार शाहीजीवन जगण्याचा प्रयत्न प्रत्येक जण करत असतो. काही वेळा त्याला ते शक्य होते, तर काही वेळा दिखावा करण्याचा मार्ग पत्करला जातो. सध्याचे युग प्रदर्शनाचा पुरस्कार करणारे आहे. विविध सुखसुविधांचा आम्ही उपभोग घेतो हे लोकांच्या लक्षात येईल, याची व्यवस्था करण्यावर भर दिला जातो. त्यावर व्यक्तीचा सामाजिक स्तर ठरवला जाऊ लागला आहे.
आपणास वैभवयुक्त जीवनाचा अनुभव घेता येईल का ? आपले वैवाहिक जीवन सुखमय असेल का ? वाहन सौख्य कसे आहे ? सुखसुविधांनी युक्त घर घेणे होईल का ? प्रतिष्ठीत वर्गाशी स्नेहसंबंध निर्माण होतील का ? याचे उत्तर प्रत्रिकेतील शुक्राच्या शुभाशुभ स्थितीवर अवलंबून असते. असे अनेक वेळा अनुभवास आले आहे कि शुक्राची कृपादृष्टी आनंदमय जीवनाचे प्रधान कारण ठरते.आपल्या पत्रिकेत जर शुक्र कन्या राशीत, पापग्रहांच्या युतीत किंवा दृष्टीत असेल तर स्त्रीशापाने वैवाहिक सौख्य मिळण्यात अडथळे आल्याचे निदर्शनास येते. आपल्या अंगभूत कलागुणांचा विकास करण्याचा अथक प्रयास केला तरी संधीचे दालन खुले होत नाही किंवा रक्ताचे पाणी करून कलोपासना केली तर त्याची कोणतीही दखल कलाक्षेत्रात घेतली जात नाही. संपूर्ण आयुष्य केवळ संघर्षासाठीच आहे का हा प्रश्न मनास त्रस्त करतो. अशा वेळेस शुक्राची सेवा, उपासना करण आवश्यक ठरते. ॥ ॐ शुक्राय नमः ॥ हा मंत्र रोज जास्तीत जास्त वेळा म्हणावा. याची जपसंख्या १६ हजार आहे. आपण शुक्रवार ते शुक्रवार असे अनुष्ठान करून जपसंख्या पूर्ण केल्यास आपल्या आर्थिक स्थितीत बदल होण्यास प्रारंभ होईल. वैवाहिक जीवन सुखमय होईल. आपल्या कलेच्या सादरी करणात चाहत्यांना मोहित करण्याचे असामान्य कौशल्य निर्माण झाल्याचा प्रत्यय येईल. ज्यांचा विवाह ठरण्यात नानाविविध अडथळे येत आहेत त्यांनी हा बिनखर्चाचा पण
अनुभवसिद्ध उपाय जरूर करावा. जीवन आनंदमय होईल. विक्रमादित्य पणशीकर
पेडणे गोवा
९०४९६००६२२
skype id - vikram.panshikar

 

विजयी व्हा !


विजयी व्हा !
प्रत्येक माणसाची आपले जीवन सुखमय, आनंदाने बहरलेले असावे अशी अपेक्षा असते आणि त्या दृष्टीने यथाशक्ती प्रत्येकाचे प्रयत्नही सुरु असतात. माणसाच्या सुखी जीवनास दुखाःच्या खाईत लोटणारी जी प्रधान कारणे आहेत, त्यात कोर्टकेस व आजारपण यांचा फार वरचा क्रमांक आहे. कोर्टकेसचा मने रक्तबंबाळ करणारा काटेरी विळखा संपूर्ण कुटुंबाच्या हलाखीस, अधोगतीस कारणीभूत ठरतो याचा ह्रदयद्रावक अनुभव कोणास येऊ नये यासाठी काय करावे हा प्रश्न सहजपणे मनात डोकावतो. सावध तो समाधानी। या सुत्रानुसार आपल्या संरक्षणाची व्यवस्था करणे हे प्रत्येकाचे प्रधान कर्तव्य आहे. कारण कलिप्रभावाने विश्वासघात करणारे बलवान झालेले दिसतात. प्रामाणिक प्रयत्न, सत्याचा मार्ग व मोहाचा त्याग करुन जीवन कंठणारे देखील कोर्टकेसमुळे भयावह मनस्ताप भोगताना दिसतात. कायद्याची पायमल्ली करणारे निरंकुश झाल्याने न्यायहक्काची मागणी हाच गुन्हा ठरत आहे असे चित्र आहे. यावर रामबाण उपाय काय याचा विचार करता कोर्टकेस ही दोन गटातील कायद्याच्या मर्यादेतील युद्धजन्य स्थितीच म्हणावी लागेल. शत्रुपक्ष पराभूत होण्यासाठी स्वतःचे मनःसामर्थ्य अतुलनिय असणे अत्यावश्यक आहे. जर केस करणारी व्यक्ती घरातील नसेल व शत्रुपक्ष अतिप्रबळ असेल तर त्यासाठी आपण रामचरित मानस मधील पुढील मंत्र म्हणणे समस्यानिवारक ठरते असा अनुभव आहे.
सुनहु पवनसुत रहनि हमारी । जिमि दसनन्हि महु जीभ बिचारी॥
यामुळे शत्रु भयभीत होतो, प्रसंगी माघार घेतो, किंवा सामंजस्याने तोडगा काढण्यास तयार होतो. आपली सत्याची बाजू असेल तर हा उपाय निश्चितच लाभप्रद सिद्ध होईल.
पण जर कुटुंबातील व्यक्तीनेच काही कारणास्तव कोर्टाची पायरी चढण्यास भाग पाडले असेल, तर आपण पुढील मंत्र म्हणावा.
गरल सुधा रिपु करहिं मिताई। गोपद सिन्धु अनल सितलाई॥
या मुळे गैरसमजाचे समस्याप्रद ढग दूर होतात व नातेसंबंध प्रस्थापित करण्याचा विचार मनात रुजण्यास प्रारंभ होतो. ज्यांना कोर्टकेसच्या चक्रातून आपली सुटका करायची असेल त्यांनी या अनुभव सिद्ध मंत्रांचा जरुर अनुभव घ्यावा.

विक्रमादित्य पणशीकर
पेडणे गोवा
९०४९६००६२२
skype id - vikram.panshikar
Panshikar999@gmail.com
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/2999254.cms

This page is powered by Blogger. Isn't yours?

Subscribe to Posts [Atom]

Visitors Map
Hosting Branica