Tuesday, July 7, 2009

 
नमः शिवाय
माता च पार्वती देवी पिता देवो महेश्वरः । ही श्रद्धा भारतभुमीच्या कणाकणात रुजली आहे. त्यामुळेचे उद्याच्या महाशिवरात्रीचा महोत्सव मोठ्या उत्साहाने सर्वत्र साजरा केला जाईल. शिवशंकराच्या सेवेचा हा प्रमुख दिवस. भाविक यथाशक्ती आपली सेवा शिवचरणी सादर करण्याचा प्रयत्न करतात. शिवाच्या साध्याभोळ्या स्वभावाचे दाखले आपणास पुराणात पानोपानी मिळतात. श्रीशिवाचा || ॐ नमः शिवाय।| हा मंत्र विशेष प्रिय आहे. आपण शिवाची आराधना करताना कठोर व्रतधारी देवतेची आराधना करतो याचे भान ठेवणे नितांत गरजेचे आहे. वैराग्यमुर्ति शिवाची उपासना सश्रद्ध मनाने शिवास सर्वस्व समजून करणे अगत्याचे आहे.शिव म्हणजे मांगल्य,आनंद,सळसळत्या उत्साहाचे अक्षय भांडार. शिवाची उपासना खडतर असल्याने पर्यायाने साधकाचे मानसिक व शारिरीक सामर्थ्य वृद्धिंगत करणारी ठरते. अमरनाथ या दुर्गमस्थळाची तिर्थयात्रा केवळ शिवकृपेनेच शक्य झाल्याचे यात्रेकरु कृतार्थ मनाने सांगतात.
महाशिवरात्रीच्या शुभदिनी शिवपूजे साठी खाली दिलेले शिवयंत्र आपण स्वतः घरी करु शकाल.यासाठी बारा आडव्या व नऊ उभ्या ओळी आखाव्यात . आपणास १०८ चोकोन तयार झाल्याचे दिसेल , या प्रत्येक चोकोनात केशरयुक्त चंदनाने ॐ नमः शिवाय हा मंत्र लिहावा.आपण हे यंत्र भुर्जपत्रावर काढावे, भुर्जपत्र न मिळाल्यास साध्या कागदावर लाल शाईने काढावे.
या यंत्राची पूजा महाशिवरात्री दिवशी रात्री निशीथकाली करावी. उद्या निशीथकाल २४.२८ ते २५.१७ या वेळेत आहे. यथासांग पूजा ,जप करुन मंत्रोच्चाराने १०८ बिल्वपत्रे अर्पण करुन शिवस्तुती हे स्तोत्र वाचावे(कैलास राणा शिव चंद्रमौळी).श्रीवसिष्ठ विरचित दारिद्र्यदहनशिवस्तोत्राचे ११ पाठ करणे विशेष फलदायी ठरेल. हे स्तोत्र म्हणावयास सोपे व शिघ्रफलदायी आहे. याप्रकारे पूजा केलेले यंत्र आपण नित्यपूजेत ठेवा. घर,व्यवसाय केंद्र या ठिकाणी यंत्राची स्थापना करणे भाग्यवर्धक ठरेल. आपल्या प्रगतीस यामुळे चालना मिळेल. अडथळ्यांची श्रृंखला खंडित होऊन , प्रामाणिक प्रयत्नास सुयश प्राप्त झाल्याचा अनुभव येईल. आपल्या नियोजीत उदिष्टपूर्तीसाठी लागणारी सकारात्मक उर्जा आपणास प्राप्त होईल. स्वतःचे वेगळेपण सिद्ध करण्याच्या या स्पर्धात्मक युगात सतत कार्यतत्पर राहण्याचे मनःसामर्थ्य शिवसाधनेने प्राप्त होईल.यामुळे मनात ठाण मांडून बसलेली भयप्रद निराशा, मरगळ, अपयशाच्या वेदनादायी आठवणींचे पाश आपण लिलया तोडू शकाल यात शंका नाही. विजय मग तो कोणत्याही क्षेत्रात असो त्यासाठी लागणारी असामान्य चिकाटी, अभेद्य महत्त्वाकांक्षा व दुर्दम्य सहनशीलता शिवकृपेने प्राप्त होते. त्याचा लाभ व्यक्तीगत जीवनात महाशिवरात्रीच्या निमित्ताने घेताना भारतभुमीत जळीस्थळी मृत्युचे तांडव सुरु असताना, राष्ट्र्संरक्षणार्थ व संवर्धनार्थ बान्धवाः शिवभक्ताश्च स्वदेशो भुवनत्रयम। हा विचार मनामनात रुजवण्याचे व्रत प्रत्येकाने कर्तव्यभावनेने स्वीकारणे नितांत गरजेचे आहे. मृत्युंजय सदाशिवाचे अभेद्यवज्र कवच भारतभुमीस प्राप्त होवो ही प्रार्थना.

Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]





<< Home

This page is powered by Blogger. Isn't yours?

Subscribe to Posts [Atom]

Visitors Map
Hosting Branica