Sunday, March 13, 2011

 

सौभाग्याचा महाद्वार खुले करा !

आपल्या भारतीय संस्कृतीत विविधसणाचा बोलबाला आहे. दसरादिवाळी सण मोठा नाही, आनंदाला तोटा असे म्हणण्याचा रिवाजच आहे. दस-यानंतर आपणास वेध लागतात ते दिवाळीचे. दिवाळीचा उत्सव हा दिपोत्सव घराघरात आनंदाने दिव्यांची रोषणाई केली जाते. घराघरात सुखासमाधानाचे, आनंदाचे, आपलेपणाचे, ऐक्याचे, सलोख्याचे, जीवाभावाचे नाते दृढ करण्यासाठी प्रत्येकाला मिळालेली ही सुवर्णसंधी आहे. दिवाळीत वैभवप्रदान करणारी धनप्रदायक लक्ष्मीदेवीची उपासना करण्यात प्रत्येक जण रममाण झाल्याचे दिसते. विविधपद्धतीच्या पूजा, जप, होमहवन, या द्वारे लक्ष्मीची उपसना करण्यात येते. मात्र आपण ज्या वास्तुत राहतो त्या वास्तुत लक्ष्मीची जेष्ठ बहिण अलक्ष्मी वास करत असेल तर कोणत्याही प्रकाराने लक्ष्मीची उपासना केली तरी घरात धनधान्यादी वैभवा आनंद उपभोगता येणार नाही.

घरातील असमाधाचे वातावरण, मतभेदाचा सतत होणारा शंखाध्वनी हे अलक्ष्मीला आग्रहाचे आमंत्रणच ठरते हे विसरून चालणार नाही. अलक्ष्मीने एकदा घरात प्रवेश केला कि तीचे अभद्र साम्राज्य निर्माण करण्याचा वेग अनाकलनीय असाच म्हणावा लागेल. मनातील उत्साहाचे प्रेरणादायी झरे केव्हा गुप्त होतात ते कळतही नाही, आणि प्रगतीचा मार्ग अरूंद होत जातो हा सार्वत्रिक अनुभाव आहे. सब नर करहिं परस्पर प्रिती । चलहि स्वधर्म निरत श्रृती निती॥ ह्या उदात्त विचाराच्या आधारावर घरात आनंदभुवन निर्माण करण्याचा प्रयत्न खंडीत होतो, मग निराशेचा अमरवेल मनास ग्रासण्यास सुरवात करतो. अशी भयावह अवस्था आपल्या मनाची होऊ नये यासाठे दयार्द्रलक्ष्मीची उपासना करण्याकडे मानवाचा कल असणे अत्यावश्यक आहे. मनास उत्साहाचे दिव्यकवच प्राप्त होण्यासाठीच हा दीपोत्सव व लक्ष्मीची उपासना. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रावापासून रंकापर्यंत प्रत्येक जण आपल्या क्षमतेने भक्तवत्सल लक्ष्मीची पूजा करतो. यथाशक्ति पूजा करण्याचा संकल्प हा करंटेपणा करूनही आपणास वैभवप्रद कृपाप्रसादाची अपेक्षा असते आणि वैभव अक्षय अखंडीत व वृद्धिंगत रहावे हा आपला आग्रह असतो. या पेक्षा हास्यास्पद गोष्ट कोणती ? देवी पूजा पद्धती हा उपचाराचा भाग भक्तास समाधानास देणारा असला तरी निरपेक्ष लक्ष्मीला सर्वार्थाने शरण जाणे हे एकमात्र अपेक्षीत आहे. गतिस्त्वं गतिस्त्बं त्वमेका भवानि । ही अचल अभेद्य निष्ठा मनात जागृत करणे परामावश्यक आहे. धनप्राप्तीकारक,वैभवप्रद,वर्चस्वप्रदायक,नेतृप्रदायक अशा नानाविविध मंत्रतंत्रयंत्र याव्दारे पूजा करूनही न मिळणारे मानसिक समाधान भगवतीच्या चरणकमली मनोभावे शरण गेल्याने प्राप्त होते. निःशेष करितां नमस्कार। नासती दोषांचे गिरिवर । आणि मुख्य़ परमेश्वर । कृपा करी॥( ०४-०७-१८) हा समर्थांचा संदेश मनात रूजवल्यास लक्ष्मीकृपेचा वरदहस्त उपासकास प्राप्त होणे सहज साध्य आहे.
सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके।
शरण्ये त्र्यम्बके गौरि नारायणि नमोeस्तुते। ( दु.स.अ.११.१०)

या प्रार्थनेने मनात गतिस्त्वं गतिस्त्बं त्वमेका भवानि । ही भावना जागृत होऊन अलक्ष्मीचे मनावरील अधिराज्य संपूष्टात येऊन मांगल्याची तोरणे घरास सुशोभित करतील असा ठाम विश्वास वाटतो.

विक्रमादित्य दाजी पणशीकर,
पेडणे-गोवा,
९०४९६००९२२
vnp999@gmail.com

Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]





<< Home

This page is powered by Blogger. Isn't yours?

Subscribe to Posts [Atom]

Visitors Map
Hosting Branica