Thursday, July 9, 2009

 

कर्पूरहोम
आपल्या भारतीय संस्कृतीत पंचमहाभूतांना अनन्यसाधारण महत्त्व दिले आहे. आपले शरीर पंचमहाभूतांपासून तयार होते. आपल्या उपासना पद्धतीत देखील पंचमहाभुतांचे मानाचे स्थान दिले जाते. आपल्याकडे प्रत्येक मंगल कार्य अग्निसाक्ष करण्याचा शास्त्रसंकेत आहे, म्हणूनच सुग्रीवाला श्रीरामाने संकट्मुक्त करण्याचे आश्वासन अग्निच्या साक्षीने दिले होते. आपले प्रत्येक धार्मिक कार्य हे अग्निच्या साक्षीनेच पूर्ण होते. तेथे अग्निची उपस्थिती निरांजन ते होमकुंडातील धगधगत्या अग्निच्या स्वरूपात असल्याचे आपणास दिसते. कित्येक मंदिरात देवदेवतांचा जत्रा-उत्सव असताना व्रतधारी भक्त अग्निकुंडातून चालत जाऊन देवतेचा उत्सव साजरा करतात, उदा. गोव्यातील श्रीलईराईच्या जत्रेत हा होमकुंडाचा उत्सव पाहण्यासाठी आजही लोकांची तोबा गर्दी होते.

आपण आपल्या दैनंदिन साधनेत अग्निची उपासना केल्यास आपल्या प्रगतीस कोणताही अवरोध निर्माण होऊच शकत नाही असा अनुभव अनेकांना आला आहे. मानवाचे यश धगधगत्या उत्साहावर , कुशल कार्यशक्तीवर , सत्याधिष्ठीत आक्रमकतेवर तसेच अभेद्य मनःसामर्थ्यवर अवलंबून असते, आणि अग्निनारायण या सर्व देवदुर्लभ यशोवर्धक गुणांची खाणच . त्यामुळे आपणास अग्निनारायणाची उपासना प्रगतीचा विस्तार करण्यास दाही दिशा मोकळ्या करते.
आजच्या धकाधकीच्या जीवनात आपणास रोज होमहवन करणे तर शक्य नाही. मग सोप्या पद्धतीने उत्साहमूर्ती अग्निची उपासना कशी करावी हा प्रश्न समोर येतो. त्यासाठी कर्पूरहोम करणे लाभप्रद ठरते. आपल्या घरी देखील हे करणे शक्य आहे. त्यासाठी एक नारळ, कापूर वडी याशिवाय अन्य काही लागत नाही. आपल्या देवघरात देवाकडे नारळाची शेंडी करून नारळ ठेवावा , शुचिर्भूत आसनावर बसावे, नारळावर कापूर वडी ठेऊन प्रज्वलित करावी व आपल्या कुलदेवतेचा किंवा उपास्य देवतेचा मंत्र म्हणावा . मंत्र म्हणणे सुरु ठेवावे. कापूर विझू नये म्हणून प्रत्येक वेळेस नवी वडी ठेवत जावी . आपली अपेक्षीत जप संख्या झाल्यावर नमस्कार करावा. आपणास यामुळे अपेक्षित कार्य़शक्ती प्राप्त होते असा अनुभव आहे. काय करावे अशी अवस्थेत असताना हा प्रयोग कराव. यामुळे निश्चित लाभ होईल.

विक्रमादित्य पणशीकर

Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]





<< Home

This page is powered by Blogger. Isn't yours?

Subscribe to Posts [Atom]

Visitors Map
Hosting Branica