Friday, April 17, 2009
कालसर्पयोग - सत्य परिस्थिती
आपल्या सभोवताली प्रत्येकाचा यशाचा पाठलाग करण्याचा दिवसरात्र प्रयत्न सुरु असतो. अपयशाची मालिका खंडित करुन विजयोत्सवाचे स्वप्न साकार करणे हे उदिष्ट आपणास सतत कार्यप्रणव करत असते. अशा वेळी आपण जन्मकुंडलीतील ग्रह काय म्हणतात ? याचा शोध घेतो. आपल्या समस्यांचे कारण कालसर्प योग आहे. असे सांगितले गेले कि आपल्या डोक्यात निराशेचे तांडव सुरु होते. आता आपले आयुष्य निराशेच्या विळख्यात गुरफटले जाणार हि भीती अधिकच गडद होते. उत्साही मनास निराशेचे पाझर फुटण्या पूर्वी कालसर्प योग म्हणजे काय आणि तो खरच अस्तित्वात आहे काय ? याचा विचार करणे नितांत गरजेचे आहे. आपल्या पत्रिकेत राहू व केतु याच्या मध्ये सर्व ग्रह असतील तर कालसर्प योग होतो , परंतु सर्वात शीघ्रगती ग्रह चंद्र सव्वादोन दिवसात एका रास बदलतो. यामुळे चंद्रासह रव्यादिग्रह निश्चीतपणे १५ दिवस एकाच बाजुला असणारा काळ केव्हा तरी असणारच. या काळात सर्वांनांच कालसर्पयोगाने भयावह फळ मिळेल असा अंदाज वर्तवणे अशास्त्रीयच म्हणावे लागेल. कारण लग्नबिन्दु, ग्रहांचे स्थानबल, नवमांश विचार, अष्टकवर्गपद्धतीनुसार बलाबल, नक्षत्रनिहाय फल , महादशा विचार या सर्वांची फलश्रृती आपणास विचारात घ्यावीच लागेल. केवळ कालसर्पयोग म्हणून आशेचे किरण आपणास दिसणार नाहीत असा समज करु नये. कारण ह्या योगास अधिकृत असा दाखला उपलब्ध होत नाही. या योगाचे भय विनाकारण लोक मनात बाळगतात. स्वतःच्या ,कुटुंबाच्या,मुलांच्या कल्याणासाठी अनेक खर्चिक उपाय करण्यास भयापोटी तयार झालेले दिसतात. आपण सर्वथा निराधार अशा या कालसर्पयोगाचे भय न बाळगता ,
आपले जीवन सुखसंपन्न होण्यासाठी पापनिष्कृती कशी होईल याची विचार करण्यावर भर देणे गरजेचे आहे. आपल्या पत्रिके नुसार आपल्या प्रगतीत अडसर येण्यास जी विविध कारणे असतात ती दूर होण्यासाठी आपली नित्य ईशसेवा गरजेची ठरते. केवळ मोठे खर्चिक विधी करुन फळाची अपेक्षा करणे हे योग्य ठरणार नाही.
मोहि समान को पाप निवासू। हा रामचरितमानस मधील पापनिष्कृती करणारा मंत्र सर्वशक्तीनीशी रोज म्हणावा . यामुळे पुण्यकर्म करण्याची प्रेरणा तर मिळेलच, पण आपल्या प्रगतीस निसंशयपणे चालना मिळेल. सर्वसमस्यांवर मात करण्याचे सामर्थ्य मनात निर्माण होईल.आपण हा साधा, सोपा, केवळ श्रद्धेची पुंजी लागणारा उपाय केल्यास यशाची महाद्वारे आपणास खुली होतील.
विक्रमादित्य पणशीकर
पेडणे गोवा
panshikar999@gmail.com
9049600622
Subscribe to Posts [Atom]
Post a Comment